Prince Borewell Incident: दोन दशकांपूर्वी घडलेली एक घटना आजही अनेकांच्या मनात जिवंत आहे. हरियाणातील कुरुक्षेत्र जिल्ह्यातील हल्दीहेडी गावात चार वर्षांचा एक चिमुकला खेळता खेळता अचानक उघड्या बोअरवेलमध्ये कोसळला… आणि क्षणात संपूर्ण देशाचं लक्ष त्या घटनेकडे वळलं. त्या मुलाचं नाव होतं प्रिन्स!
त्यावेळी परिस्थिती अत्यंत गंभीर होती. सुमारे १०० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकलेल्या या चिमुकल्याला वाचवण्यासाठी सैन्यानं तब्बल ५० तास बचावकार्य राबवलं. प्रत्येक क्षण तणावाचा होता… संपूर्ण देश प्रार्थना करीत होता. अखेर अडीच दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर प्रिन्सला सुखरूप बाहेर काढण्यात आलं आणि सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
पण आता २० वर्षांनंतर… तोच प्रिन्स कुठे आहे? कसा दिसतो? काय करतो?
याचं उत्तर देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे आणि तो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
आता २४ वर्षांचा झाला प्रिन्स!
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये प्रिन्स आता पूर्णपणे बदलल्याचे दिसते. तो आता चार वर्षांचा लहान मुलगा नसून, २४ वर्षांचा तरुण झाला आहे. काळ किती झपाट्यानं पुढे सरकतो याचं हे जिवंत उदाहरणच जणू!
या व्हिडीओमध्ये तो कुरुक्षेत्रचे खासदार नवीन जिंदाल यांच्यासोबत दिसतो. दोघांमध्ये हलक्याफुलक्या गप्पा रंगल्या आहेत. प्रिन्स सांगतो की, तो कुरुक्षेत्रामधील पोलो ग्राऊंडवर पोलो सामना पाहण्यासाठी आला आहे. त्याचा आत्मविश्वास, बोलण्याची शैली आणि व्यक्तिमत्त्व पाहून अनेकांना विश्वासच बसत नाही की, हा तोच लहानसा मुलगा आहे, ज्यासाठी एकेकाळी संपूर्ण देश चिंतेत होता.
काय करतो प्रिन्स सध्या?
व्हिडीओमध्ये प्रिन्स आपल्या आयुष्याबद्दलही सांगतो. त्यानं आयटीआयचं शिक्षण पूर्ण केलं असून, पुढील शिक्षणही सुरू आहे. साध्या कुटुंबातून आलेला प्रिन्स आजही आपल्या मुळांशी जोडलेला आहे. त्याचे वडील दिहाडी कामगार असून, कुटुंबानं खूप संघर्षातून हे दिवस पाहिले आहेत.
सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया उमटत आहेत. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून, हजारो जणांनी तो शेअर केला आहे. अनेकांनी प्रिन्सच्या धैर्याचं कौतुक केलं आहे.
एका युजरनं लिहिलं, “जाको राखे साईंया, मार सके ना कोय!”
दुसऱ्यानं म्हटलं, “त्या छोट्या मुलानं दाखवलेलं धैर्य खरंच प्रेरणादायी आहे.”
तर काहींनी त्यावेळी बचावकार्य करणाऱ्या सैन्याच्या जवानांचंही मनापासून कौतुक केलं.
तो क्षण अजूनही ताजा…
आज २० वर्षांनंतरही ती घटना लोकांच्या मनातून पुसली गेलेली नाही. एका छोट्याशा मुलासाठी संपूर्ण देश एकत्र आला होता ही गोष्टच त्या प्रसंगाला वेगळं महत्त्व देते.
आता प्रिन्स मोठा झाला, आयुष्यात पुढे चाललाय… पण त्याची ती कहाणी अजूनही प्रेरणा देऊन जाते.
तुम्हालाही आठवतोय का तो प्रसंग? हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या मनातही त्या आठवणी नक्कीच जाग्या होतील.
