‘सिंग इज किंग’, होय त्यांच्याकडे आहे प्रत्येक पगडीला मॅचिंग रोल्स-रॉयस

पगडीमुळे एका इंग्लिश नागरिकांनी त्यांचा अपमान केला होता

(छाया सौजन्य : ट्विटरवरून साभार)
‘तुमच्या डोक्यावर बांधलेली पगडी ही मलमपट्टी केल्यासारखी भासते’ यावरून ब्रिटनमधल्या पंजाबी व्यावसायिकाची काही दिवसांपूर्वी एका ब्रिटीश व्यक्तींने वारंवार हेटाळणी केली. ही पगडी भलेही तुम्हाला हास्यास्पद वाटू शकते पण, आमच्या पेहरावाचा आम्हाला अभिमान आहे. ही पगडी आमच्या संस्कृतीचा भाग आहे पण ती पगडी माझा स्वाभिमानदेखील आहे असं सांगत ब्रिटनस्थित व्यावसायिक रुबेन सिंग यांनी ब्रिटीश व्यक्तीला सडेतोड उत्तर दिलं आहे. इतकंच नाही तर पेहरावावरून कमी लेखणाऱ्या ब्रिटीश माणसाला त्यानी एक आवाहन देखील दिलं.

माझ्या प्रत्येक पगडीला मॅचिंग गाडी माझ्याकडे आहे असं सांगत त्यांनी आपल्या आलिशान रोल्स-रॉयससोबत आपले फोटो शेअर केले. आठवडाभर सुरू असलेल्या रुबेन सिंग यांच्या ‘टर्बन चॅलेन्ज’ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळाली. रुबेन यांनी दरदिवशी आपल्या आलिशान रोल्स-रॉयसगाडीसोबत एक एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला. यात आपल्या डोक्यावर असणार्या पगडीला मॅचिंग आलिशान गाडी आपल्याकडे आहे हे त्यांनी कमी लेखणाऱ्या माणसाला दाखवून दिलं. त्यामुळे एखाद्याच्या कपड्यावरून त्याला हिणवणाऱ्या ब्रिटीश व्यक्तीला चांगलीच चपराक बसली.

रुबेन सिंग यांना ‘ब्रिटीश बिल गेट्स’ म्हणूनही ओळखतात. ९० च्या दशकात त्यांचा ‘मिस अॅटिट्यूड’ हा कपड्यांचा ब्रँड प्रसिद्ध होता. २००७ मध्ये ते कर्जबाजारी झाले. पण, ते पुन्हा शून्यातून उभे राहिले आणि  व्यवसायात आपला जम बसवला. रुबेन सिंग हे ‘ऑल डे पा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

 

https://twitter.com/SinghLions/status/954304400486313984

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Reuben singh match his turbans to his rolls royce cars for an entire week