जगातील अनेक देशांतील लोकं महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सुटकेचा नि:श्वास सोडत असले तरी चीनमध्ये कोविड-१९ प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांना घरातच राहावे लागत आहे. करोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने लोकांना जागरूक करण्यासाठी रोबोट कुत्र्यांचा वापर सुरू केला आहे. रोबोटिक कुत्र्याच्या पाठीमागे स्पीकर बांधून, हा कुत्रा रिकाम्या रस्त्यावर चालवला जात आहे जेणेकरून शेजारी राहणाऱ्या लोकांना उद्घोषक ऐकू येईल.

चीन मध्ये शांघाय शहरात लॉकडाऊन

चीनमधील सर्वात मोठे शहर आणि आर्थिक महासत्ता असलेल्या शांघायमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. देशातील कठोर शून्य-कोविड धोरणांतर्गत येथील काही रहिवाशांना त्यांच्या घरात १० दिवस वेगळ्या खोलीत राहावे लागत आहे. बोस्टन डायनॅमिक्स स्पॉटसारखा दिसणारा चार पायांच्या रोबोटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये रोबो कुत्रा डोक्याजवळ मेगाफोन स्पीकर लावून रस्त्यांवर फिरत असल्याचे पाहायला मिळालं आहे.

रोबो डॉग पाहून यूजर्स झाले आश्चर्यचकित

रोबो कुत्र्याचे काम महत्त्वाचे आरोग्यविषयक घोषणा करणे आणि नागरिकांना कोव्हिड प्रोटोकॉलची आठवण करून देणे हे आहे. झुआनचेंग डेलीनुसार, फेस मास्क लावा, वारंवार हात धुवा, आपला शरीराच तापमान नियमित तपासात रहा आणि तुमचं घर निर्जंतुक करा यासारख्या घोषणा रोबो डॉगच्या मागच्या मेगाफोन स्पीकरद्वारे केल्या जातात.

व्हिडीओ पाहून युजर्सना वाटले की हा सायन्स फिक्शन फिल्मचा व्हिडीओ आहे.