आजकाल आपण सगळेच ऑनलाइन ऑर्डर करतो. जेवण असो, किराणा असो किंवा काही छोटंसं सामान; पण ऑर्डरला थोडासा जरी उशीर झाला तरी लगेच तक्रार, कॉल, मेसेज सुरू होतात “अजून किती वेळ लागेल?” याच फास्ट डिलिव्हरीच्या स्पर्धेत आता १० मिनिटांत डिलिव्हरी देण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे; पण या वेगाच्या शर्यतीचा डिलिव्हरी करणाऱ्या माणसांवर किती ताण येतो, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे.
अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओत एक तरुण रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक असतानाही, सुरक्षेची कोणतीही फिकीर न करता रोलर स्केटिंग करीत डिलिव्हरी करताना दिसतो. वेगवान डिलिव्हरीसाठी तो जीव धोक्यात घालत असल्याचं दिसत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ एका डिलिव्हरी बॉयचा आहे, जो नेहमीच्या बाईक किंवा सायकलऐवजी रोलर स्केट्स वापरून डिलिव्हरी करताना दिसतो. त्यानं एका कंपनीचा टी-शर्ट घातलेला असून, त्याच्या पाठीवर डिलिव्हरी बॅगही आहे. विशेष बाब म्हणजे हा व्हिडीओ अशा वेळी समोर आलाय जेव्हा १० मिनिटांत डिलिव्हरी देण्याच्या सेवांसंबंधीच्या सुरक्षिततेबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
व्हिडीओमध्ये तो तरुण भरधाव ट्रॅफिकच्या रस्त्यावर रोलर स्केटिंग करताना दिसतो. कार, बाईक आणि ऑटो यांच्यामधून तो तोल सांभाळत पुढे जातो. पण, सर्वांत धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यानं हेल्मेट, गुडघे अन् कोपरांचे पॅड किंवा इतर कोणतीही सुरक्षा साधनं परिधान केलेली नाहीत. त्याचा वेग पाहता एक छोटीशी चूकही मोठा अपघात ठरू शकते. त्यामुळे अनेक लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. काहींना हा सीन ‘कोई मिल गया’मधल्या कृषची आठवण करून देत आहे, असं वाटत आहे; तर काहींनी त्याला थेट जीवावर बेतणारा प्रकार, असं म्हटलं आहे.
पाहा व्हिडीओ
या व्हिडीओखाली लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोक म्हणतात, “हा मुलगा खूप टॅलेंटेड आहे. आपली कला वापरून काम करतोय.” तर काहींचं म्हणणं आहे, “ही डिलिव्हरी नाही, थेट जीवघेणा स्टंट आहे.” अनेक युजर्सनी डिलिव्हरी कंपन्यांना संबोधूनही कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस नियम का नाहीत यांसारखे प्रश्न विचारले आहेत.
काही सकारात्मक प्रतिक्रिया देणाऱ्यांचं मत आहे की, योग्य प्रशिक्षण आणि सुरक्षा साधनं दिली नाहीत, तर अशा पद्धतीनं शहरात डिलिव्हरी करणं धोक्कादायक आणि वेगवान ठरू शकतं. हा व्हिडीओ केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून, तो डिलिव्हरी सिस्टीम, कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि वेगावर आधारित स्पर्धा यांवर गंभीर प्रश्न मांडत आहे. टॅलेंट महत्त्वाचं आहे; पण जीवापेक्षा मोठं काहीच नाही.
