करोनामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. जगभरामध्ये करोनाबाधितांची संख्या (रविवार, २२ नोव्हेंबर २०२० पर्यंत) पाच कोटी ८० लाखांहून अधिक झाली आहे. जगभरामध्ये करोनामुळे मरण पावलेल्यांच्या संख्येने १३ लाख ८० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. करोनाचा संसर्ग झाल्यास रुग्णाला अन्नपदार्थांची चव कळत नाही. तोंडाची जव जाणे तसेच गोष्टींचा सुगंधही न घेता येणे यासारख्या गोष्टी करोनाच्या लक्षणांपैकी आहेत. त्यामुळेच करोनाची लागण झाली आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी चव आणि नाक दोन्ही गोष्टींकडे लक्ष देण्याचे मजेदार सल्ले इंटरनेटवर व्हायरल होताना दिसतात. मात्र याचसंदर्भात एक विचित्र व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला असून करोनाचा संसर्ग झाल्यानंतर खरोखरच तोंडाची चव जाते हे दाखवून देण्यासाठी हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे.

आपल्या तोंडाची चव गेली आहे हे दाखवण्यासाठी एका तरुणाने कच्चे कांदे आणि लसूण खाल्ले. या गोष्टीचा व्हिडीओ शूट करुन तो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव रसेल डोनली असं असून तो ३० वर्षांचा आहे. काही दिवसांपूर्वीच रसेलला करोनाची लागण झाली. करोनाची लागण झाल्याने रसेलच्या तोंडाची चव गेली आणि त्याला वस्तूंचा वासही येत नव्हता. आपल्याला खरोखर करोना झाला आहे दाखवून देण्यासाठी रसेलने एका खोलीत बसून कच्चे कांदे, लसूण, बेबी फूड, सार्डिन (छोट्या आकाराचा मासा) खाल्ला तसेच लिंबाचा रसही प्यायला.

या सर्व पदार्थांना एक उग्र वास असतो आणि त्याची चवही लगेच समजते. मात्र आपल्यावर याचा काहीच परिणाम होत नसल्याचे रसेलला दाखवायचं होतं. त्यामुळेच त्याने व्हिडीओ शूट करुन टिक-टॉकवर शेअर केला. आपल्याला कशाचीच चव कळत नाही किंवा काहीही खाललं तरी ते बेचव लागत आहे हे सांगण्यासाठी त्याने कांद्यापासून ते उग्र वास येणाऱ्या लसणापर्यंत आणि तिखट गोष्टींही खाल्ल्या.

एनजे डॉट कॉमशी चर्चा करताना रसेलने आपण हा व्हिडीओ आपल्या मित्रांसाठी आणि अन्य फॉलोअर्ससाठी टिकटॉकवर पोस्ट केल्याचे सांगितले. हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर खरोखरच मला कोणत्याच गोष्टींची चव लागत नाहीय यावर विश्वास ठेवणं लोकांना कठीण जात होतं. सर्वात आधी रसेल या व्हिडीओत कांदे खाताना दिसतो त्यानंतर तो लिंबाचा रस पितो मात्र त्याला कसलीच चव जाणवत नाही. त्यानंतर रसेल एक चमचा भर लसूण पेस्टही खातो. मात्र त्यानंतरही त्याला काहीच जाणवत नाही. “हा खूप धोकादायक विषाणू आहे,” असं रसेल नंतर सांगतो.

हा व्हिडिओ आतापर्यंत पावणे दोन कोटींहून अधिक जणांनी पाहिला आहे.