Samsung Galaxy S27 Ultra Battery Details Leak : सॅमसंग आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन मालिकेसाठी सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या एका मोठ्या अपग्रेडवर काम करत असल्याची चर्चा आहे. अलीकडील लीकनुसार, कंपनी आगामी गॅलेक्सी एस २७ (S27) अल्ट्रासाठी मोठ्या बॅटरीवर काम करते आहे. जर ही माहिती खरी ठरली, तर गॅलेक्सी S27 अल्ट्रामध्ये यापूर्वीपेक्षा जास्त बॅटरी बॅकअप मिळू शकतो. सॅमसंगच्या अल्ट्रा सिरीजमधील फोनमध्ये गेल्या काही वर्षांनंतर बॅटरी क्षमतेत होणारी ही पहिली मोठी वाढ ठरू शकते. याशिवाय, दावे खरे ठरल्यास सध्या चर्चेत असलेल्या आयफोन 18 प्रो मॅक्सपेक्षाही मोठी बॅटरी गॅलेक्सी S27 अल्ट्र मध्ये दिली जाऊ शकते. मात्र, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

बॅटरीसाठी चाचणी अद्याप सुरु

सॅमसंगकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. पण, लीक झालेल्या माहितीमुळे सॅमसंग सध्या अनेक चीनी स्मार्टफोन कंपन्यांप्रमाणे सिलिकॉन-कार्बन बॅटरीचा वापर करण्याऐवजी पारंपरिक लिथियम-आयन बॅटरीवरच भर देत आहे. मात्र, या बॅटरीची क्षमता आणि कार्यक्षमता अधिक चांगली करण्यावर कंपनीचे लक्ष असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच, आगामी फोनमध्ये सॅमसंग लिथियम-आयन बॅटरीच वापरू शकते. पण, ती पूर्वीपेक्षा अधिक मोठी आणि सुधारित असण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कंपनीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

ही माहिती एक्स लीकर श्रोडिंगर @phonefuturist यांच्याकडून मिळाली आहे, ज्यांच्या मते सॅमसंग ५,६००mAh ते ५,८००mAh क्षमतेच्या सॅमसंग एसडीआय (Samsung SDI) च्या नवीन बॅटरी सेलची चाचणी करत आहे. सॅमसंगने सुरुवातीला ५,२०० mAh क्षमतेच्या बॅटरीचा निर्णय घेतला होता. पण, नंतर त्यांनी आपला विचार बदलून मोठ्या क्षमतेच्या बॅटरीची चाचणी करण्यास सुरुवात केली. चाचणी यशस्वी झाल्यास, S27 Ultra ५,५०० mAh पेक्षा जास्त क्षमतेच्या बॅटरीसह बाजारात येऊ शकेल.

बॅटरी क्षमतेत होणारी ही पहिलीच वाढ असेल का?

कंपनीच्या ‘अल्ट्रा’ (Ultra) सिरीजची ५,००० mAh क्षमतेची दीर्घकाळापासूनची मर्यादा अखेर ओलांडली जाईल. S20 Ultra, S21 Ultra व S22, S23, S24, S25 आणि S26 Ultra या सर्वांमध्ये ५,००० mAh बॅटरीची क्षमता होती. केवळ नवीन चिप्स आणि अधिक स्मार्ट सॉफ्टवेअरमुळे बॅटरी लाईफमध्ये थोडीफार सुधारणा झाली होती. त्यामुळे ५,६००mAh ते ५,८००mAh क्षमतेच्या सॅमसंग एसडीआय (Samsung SDI) च्या नवीन बॅटरी सेलची चाचणी करत आहे हा केवळ एखादा छोटासा बदल नसून, अनेक वर्षांनंतरची ही पहिलीच मोठी झेप ठरू शकते.

google trends

इतर कंपन्या सिलिकॉन-कार्बन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक क्षमतेच्या बॅटरी पातळ फोन्समध्ये बसवत आहेत. पण, सॅमसंगने मात्र अद्याप हा मार्ग स्वीकारलेला नाही. ते अजूनही विश्वासार्ह, ठरलेल्या लिथियम-आयन बॅटरींचाच वापर करत आहेत आणि केवळ त्यांची कार्यक्षमता व रचना यात सुधारणा करत आहेत.

सॅमसंग आयफोन १८ प्रो मॅक्सला मागे टाकू शकेल का?

आयफोन आणि सॅमसंग यांच्यातील बॅटरीच्या तुलनेबद्दल बोलायचे झाल्यास, अलीकडील लीकनुसार आयफोन 18 प्रो मॅक्समध्ये eSIM मॉडेलसाठी 5,425mAh आणि फिजिकल SIM ट्रे असलेल्या मॉडेलसाठी 5,235mAh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते. जर सॅमसंगने गॅलेक्सी S27 अल्ट्रामध्ये 5,500mAh पेक्षा मोठी बॅटरी दिली. तर स्पेसिफिकेशन्सनुसार बॅटरी क्षमतेच्या बाबतीत सॅमसंग आघाडीवर दिसू शकतो. मात्र, मोठी बॅटरी म्हणजेच जास्त बॅटरी बॅकअप असे नेहमीच नसते. कारण – ॲपलचे iOS आणि सॅमसंगचे Android ऑपरेटिंग सिस्टीम, तसेच दोन्ही कंपन्यांचे प्रोसेसर बॅटरीचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करतात. त्यामुळे प्रत्यक्ष वापरात कोणता फोन जास्त काळ टिकतो, हे दोन्ही स्मार्टफोनची प्रत्यक्ष चाचणी झाल्यानंतरच स्पष्ट होईल.