Sachin Tendulkar Wrestler Protest Reaction: कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी मागील दोन महिन्यांपासून आंदोलन पुकारले आहे. २८ मेला नव्या संसदेच्या उद्घाटनाच्यावेळी संसदेच्या दिशेने जाणाऱ्या या कुस्तीपटू आंदोलनकर्तायन्ना पोलिसांनी अटक केली होती. यानंतर त्यांनी काष्ठाने कमावलेली पदकं गंगेत विसर्जित करण्याची घोषणा केली होती. बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक या तिघांनीही सोशल मीडियावर ट्वीट करत आपली याविषयीची भूमिका मांडली होती. या आंदोलनावर देशभरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने या विषयाची अद्याप दखल घेतलेली नाही. सचिनने आपली भूमिका न मांडल्याने आता त्याला प्रश्न करणारे काही बॅनर्स सचिन तेंडुलकरच्या घराच्या समोर लावण्यात आले आहेत. मुंबई युवक काँग्रेसने हे बॅनर लावून सचिनला तुम्ही मूग गिळून गप्प का? सीबीआयची धाड पडेल अशी भीती वाटते का? असे प्रश्न केले आहेत.
सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर झळकले बॅनर्स
मुंबई प्रदेश युवक काँग्रेस प्रवक्ता रंजिता गोरे यांच्या नावे झळकलेल्या बॅनर्समध्ये म्हटले आहे की, “मत विरहित भारतरत्न सचिन तेंडुलकरजी भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये तुम्ही मूग गिळून गप्प का? शेतकरी आंदोलनावर बोलणाऱ्या परकीय महिला खेळाडूला तुम्ही सणसणीत उत्तर दिलं होतं. आमच्या देशांतर्गत प्रश्नात तू नाक खुपसू नकोस, असं सुनावलं होतं. आज मात्र सचिन तुझे तेच देश प्रेम कुठे गेले आहे? अशी विचारणा युवक काँग्रेसचे प्रवक्ते रंजीता गोरे यांनी केली आहे. त्याचवेळी सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीच्या धाडींची तुला भीती वाटतीये का? तू कुठल्यातरी दबावाखाली आहेस का?
क्रीडा विश्वातील तुम्ही देव माणूस आहात. एक भारतरत्न देखील आहात मात्र जेव्हा क्रीडा विश्वातील काही महिला लैंगिक अत्याचार विरोधात आवाज उठवत आहेत. तेव्हा मात्र आम्हाला तुमच्यातील माणूस आणि तुमच्यातील माणुसकी कोठेही दिसून येत नाही. “
हे ही वाचा<< कुस्तीपटूंचे आंदोलन खोटे? साक्षी मलिक, बजरंग पुनिया हसत होते? Viral फोटोचं सत्य वाचून डोळे उघडतील
अलीकडेच, सचिन तेंडुलकरची राज्याच्या स्वच्छ मुख अभियानासाठी महाराष्ट्राचा ‘स्माइल अँबेसिडर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी सचिनला टोला लगावला आहे. “आपले कुस्तीगीर न्याय मागत आहेत पण भाजपा त्यांच्या खासदाराला वाचवण्यासाठी कुस्तीगीरांच्या आंदोलनाकडे डोळेझाक करत आहे. जसा तू आमचा अभिमान आहेस, तशाच आपल्या देशातील महिला कुस्तीपटूही आमचा अभिमान आहेत. एक खेळाडू म्हणून तू तुझ्या बांधवांना पाठिंबा दिला पाहिजेस, हे आपलं कर्तव्य आहे. आम्हाला आशा आहे की, तू यावर बोलशील आणि आपल्या कुस्तीपटूंचा ‘स्माइल अँबेसिडर’ होशील.” असे म्हणत क्रास्टो यांनी ट्वीट केले होते.