कर्तव्यदक्ष असलेल्या आणि जनतेच्या रक्षणासाठी दिवस रात्र काम करणा-या मुंबई पोलिसांची पुन्हा एकदा सोशल मीडियावर खूप स्तुती होत आहे. कारण मुंबई पोलिसांच्या मदतीमुळे हरवलेल्या आजींना आपल्या घरी परत जाता आले आहे. अधिकारी आडनावाच्या वृद्ध महिलेला स्मृतिभ्रंश झाला आहे. त्यामुळे त्यांना काहीच आठवत नव्हते. ५ वेगवेगळ्या भाषा बोलू शकणा-या या वृद्ध महिलेला आपण नेमके कुठून आलो आहोत, आपले नाव, पत्ता यापैकी काहीच आठवत नव्हते. पण मुंबई पोलिसांनी या आजीचे घर शोधून काढले आणि त्यांना सुखरुप घरी पोहचवले. साकिनाका पोलिस स्टेशनमध्ये असलेल्या अधिकारी यांच्या घरच्यांचा शोध घेण्यास पोलिसांना अडचणी येत होत्या. त्यामुळे चार दिवसांपासून आपल्या मायेच्या माणसांपासून त्या दूर होत्या. पण साकिनाका पोलिसांनी कर्तव्यदक्षता बजावत या आजींची त्यांच्या कुटुंबियांशी भेट घालून दिली. मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या आजींचा फोटो शेअर केला. सगळ्यांनी मुंबई पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.