Financial Savings Tips: दर महिन्याला ज्यावेळी तुमचा पगार येतो, तेव्हा या महिन्यात पैसे वाचवायचे असं तुम्ही ठरवता. पण महिन्याच्या अखेरीस जवळपास तुमचं अकाउंट पूर्ण रिकामं झालेलं असतं. अनेकांना वाटतं की, कमी उत्पन्न हेच त्यांच्या बचत न करण्याचं कारण आहे. बंगळुरूमधील एक नोकरदार व्यक्तीच्या मते, समस्या केवळ पगाराची नाही, तर रोजच्या छोट्या छोट्या खर्चांची आहे. हे छोटे खर्च नकळत तुमचे खिसे रिकामे करू शकतात. त्याची पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसंच अनेकांना त्याचा अनुभव स्वत:शी मिळताजुळता वाटत आहे.
त्याने असे सांगितले की, जेव्हा त्याने आपल्या मासिक खर्चांची यादी तयार केली, तेव्हा त्याच्या लक्षात आले की मोठ्या खर्चांपेक्षा ज्या लहान सवयींकडे त्याने नेहमी दुर्लक्ष केलं होतं नेमक्या त्याच अधिक नुकसान करत होत्या. अशा या खिसा पोखरणाऱ्या खर्चाच्या पाच सवयींबद्दल जाणून घेऊ आणि वेळीच सावध होऊ…
वारंवार ऑनलाईन ऑर्डर करणे
सध्या जेवण ऑर्डर करणे, १० मिनिटांत किराणा सामान घरपोच मागवणे किंवा प्रत्येक लहानसहान गोष्टीसाठी डिलिव्हरी अॅप्स वापरणे हे सामान्य झालं आहे. मात्र या सोयीमुळे दर महिन्याला हजारो रूपयांचा अतिरिक्त खर्च होऊ शकतो. डिलिव्हरी चार्जेस, पॅकेजिंग फी आणि टीप मिळून एक मोठं बिल तयार होतं. केवळ आवश्यक असेल तेव्हाच या सेवा वापरल्यास मोठी बचत होऊ शकते.
छोटी ऑनलाईन खरेदी
२०० किंवा ५०० रूपयांच्या खरेदीने काय फरक पडेल असा प्रश्न अनेकांना पडतो. पण संपूर्ण महिन्याचा विचार केल्यास या छोट्या खरेदीची बेरीज मात्र मोठी किंमत असते. सवलती आणि सेलच्या नावाखाली लोक त्यांना गरज नसलेल्या वस्तूदेखील खरेदी करतात.
नियोजनाशिवाय विकेंड
विकेंड आला की, कॅफे, मॉल, पब किंवा बाहेर फिरायला जाण्याचे बेत आखले जातात. खर्चाचे नियोजन नसल्यास खर्च झपाट्याने वाढतो. कधीकधी मित्रांसोबत वेळ घालवल्यामुळे गरजेपेक्षा जास्त खर्च होऊ शकतो. त्यामुळे आधीच नियोजन केल्यास अनावश्यक खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते.
इतरांच्या पसंतीनुसार गॅजेट बदलणे
दरव्रषी नवीन मोबाईल, लॅपटॉप किंवा स्मार्टवॉच खरेदी करण्याच्या सवयीमुळेही बचतीत घट होऊ शकते. अनेक लोक त्यांचे जुने उपकरण अजूनही उत्तम प्रकारे काम करत असूनही केवळ त्यांचे मित्र किंवा सहकारीनवीन मॉडेल वापरत आहेत म्हणून नवीन गॅजेट खरेदी करतात. या सवयीमुळे पुढे दीर्घकाळासाठी आर्थिक ओझं तयार होऊ शकतं.
दररोज बाहेर जेवणे
दररोज ऑफिसबाहेर दुपारचे किंवा रात्रीचे जेवण केल्याने महिन्याचा मोठा खर्च होऊ शकतो. घरचे जेवण केवळ स्वस्तच नाही तर आरोग्यासाठीही चांगले असते. बंगळुरूमधील एका व्यक्तीने सांगितले की, जेव्हा त्याने आठवड्यातून काही दिवस घरचे जेवण खाण्यास सुरूवात केली, तेव्हा त्याची बचत वाढली आणि आरोग्यात सुधारणा झाली.
केवळ जास्त उत्पन्नामुळे बचत होत नाही
अनेकांना असं वाटतं की, जास्त पगारामुळे आपोआप बचत होईल. पण हे नेहमीच खरे नसते. जर उत्पन्नासोबत खर्चही वाढत असेल तर बँक बॅलन्समध्ये फारसा फरक पडत नाही. तज्ज्ञ . याला Lifestyle inflation असं म्हणतात, म्हणजेच उत्पन्न वाढल्याने खर्चही वाढतो.
चांगली बचत कशी करावी?
जर तुम्हाला दर महिन्याला काही पैसे वाचवायचे असतील, तर सर्वात आधी तुमच्या सर्व खर्चांची नोंद ठेवा. कोणते खर्च आवश्यक आहेत आणि कोणते केवळ सवयी आहेत हे ओळखा. ऑनलाईन शॉपिंग, फूड डिलिव्हरी आणि इतर अनियोजित खर्चांमध्ये कपात केल्यास तुम्हाला दर महिन्याला मोठी बचत करता येऊ शकते.
सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट केलेल्या बंगळुरूमधील या व्यक्तीच्या मते, श्रीमंत होण्यासाठी केवळ मोठा पगारच नव्हे तर चांगल्या आर्थिक सवयींचीही गरज असते. जोपर्यंत तुम्ही तुमच्या लहानसहान खर्चांकडे लक्ष देत नाही, तोपर्यंत चांगले उत्पन्न असूनही पैसे वाचवणे कठीण होईल. यामुळेच चांगला पगार मिळवूनही महिन्याच्या शेवटी अनेक लोकांकडे पैशाचा खडखडाट असतो.
