सलमान खान दिल्लीतल्या इंडिया गेट आणि कॅनॉट प्लेस जवळून मध्यरात्री त्याचं वाहन चालवत होता. त्याला त्याचा वेळ घालवायचा असल्याने तो वाहन चालवत होता. मात्र तो अचानक रस्त्यावर थांबला त्याने पाहिलं गर्दी जमली आहे. नेमकं काय झालं हे बघायला सलमान थांबला, त्याने पाहिलं की एक माणूस रस्त्याच्या मधोमध पडला आहे, तो बेशुद्ध आहे आणि त्याच्या शरीरातून रक्त वाहतं आहे. सलमान खान म्हणाला की मला हे पाहून धक्का बसला की लोक जमले आहेत पण कुणी काहीही करत नाही. त्याने थेट पोलिसांना फोन करुन हा प्रकार सांगितला.

शिवम गुप्ता या व्यावसायिकाला मारहाण

दिल्लीत डिलिव्हरीसाठी काम करणाऱ्या सलमान खानने माणुसकी दाखवली आणि ३ जानेवारीचा तो प्रसंग आठवत आपण कसा पोलिसांना फोन केला हे सांगितलं. शिवम गुप्ता या व्यावसायिकाला मारहाण करण्यात आली होती. दोन डिलिव्हरी एजंटनी त्या व्यावसायिकाला मारहाण केली. या मारहाणीत शिवम गुप्ता या ३६ वर्षीय व्यावसायिकाला गंभीर दुखापत झाली आणि डोक्यालाही जखमा झाल्या. ज्यामुळे त्याची शुद्ध हरपली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण १९ जानेवारीला उपचारांच्या दरम्यान त्याचं निधन झालं. सलमान खान या डिलिव्हरी बॉयने सांगितलं तो प्रसंग आठवला की काटा येतो. शिवम गुप्ता रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि लोक फक्त व्हिडीओ काढत होते, तो कसा पडलाय बघत होते. कुणीही त्याला मदत करायला तयार नव्हतं. मी पोलिसांना फोन केला आणि पोलीस तिथे अवघ्या दहा मिनिटांत रुग्णवाहिकेसह पोहचले असं सलमान खान या डिलिव्हरी बॉयने ‘द प्रिंट’ला सांगितलं.

पोलिसांनी या घटनेबाबत काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डिलिव्हरी एजंट नशेत होते असा आरोप त्यांच्यावर आहे. तसंच शिवम गुप्ता आणि या दोघांमध्ये वाद झाला. या वादावरुन शिवमला या दोघांनी मारहाण केली. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यावरुन गुन्हा नोंदवला. या दोघांनाही अटक करण्यात आली आणि त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ज्याने साक्ष दिली तो सलमान खान मूळचा पानिपतचा

सलमान खान या ड्रायव्हरने दिलेली महत्त्वाची माहिती गुन्हा उकल करण्यासाठी महत्त्वाची ठरली. सलमान खान हा चालक मूळचा पानिपतचा आहे. पिकअप ड्रायव्हर आणि बोलेरोचा चालक म्हणून तो काम करतो. ३ जानेवारीच्या रात्री सलमानला डिलिव्हरी घ्यायची होती म्हणून तो चालाहोता. नोएडा या ठिकाणी जायच्या आधी एक चक्कर इंडिया गेट आणि कॅनॉट प्लेसला मारु असं त्याने ठरवलं. कॅनॉट प्लेस आणि इंडिया गेट या ठिकाणी रात्री खूप छान वातावरण असतं असं त्याने ऐकलं होतं म्हणून तो या ठिकाणी गेला आणि त्याला समोर ही घटना घडलेली कळली. ज्यानंतर त्याने पोलिसांना याबाबत सांगितलं. पोलीस म्हणाले की सलमान खानने त्याचं कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडलं.