भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा जवळपास दोन वर्षांच्या मातृत्वाच्या रजेनंतर सानिया आता पुनरागमन करण्यासाठी खडतर सराव करत आहे. दिवसाला किमान चार तास सराव करून सानियाने २६ किलो वजन कमी केले आहे. आपल्या वर्कआऊटचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
सानियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओबरोबर वजन कमी करण्यासाठी करत असलेल्या व्यायामाबद्दल सांगितले आहे. सानियाने मागील वर्षी ३० ऑक्टोबर रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला. आई झाल्यानंतर काही महिने आराम केल्यावर तिने हळूहळू व्यायामाला सुरुवात केली. गर्भधारणेदरम्यान वाढलेले वजन कमी करण्यासाठी तिने व्यायाम सुरु केला आहे. सध्या दिवसाला ती चार तास सराव आणि व्यायाम करते असं तिने याआधीच सांगितले होते. नुकत्याच तिने केलेल्या पोस्टमध्ये तिने आई झाल्यानंतर वजन कमी कसं करायचं असा सवाल विचारणाऱ्या महिलांना खास संदेश दिला आहे. ‘मी आई झाल्यानंतर आता पुन्हा (एकदा मैदानात उतरण्याच्या उद्देशाने) निरोगी आणि तंदुरुस्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. दरम्यान मागील काही महिन्यांमध्ये अनेकांनी मला माझ्या वजन कमी करण्यासंदर्भात विचारले. कसं? कधी? कोणतं? कुठे? असे वजन कमी करण्यासंदर्भातील अनेक प्रश्न मला विचारण्यात आले. म्हणून मी आता इथे (इन्स्टाग्रामवर) व्यायामाचा रोज एक व्हिडिओ पोस्ट करणार आहे. मी गरोदर होते तेव्हा माझे वजन 23 किलोंनी वाढले होते. मात्र मागील चार महिन्यांमध्ये बरेच कष्ट करुन, नियमित व्यायाम करुन मी २६ किलो वजन कमी केले आहे. आई झाल्यानंतर वजन कसे कमी करावे, स्वत:च्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी यासंदर्भात अनेक महिला मला मेसेजवरुन विचारत असतात. त्या महिलांना इतकचं सांगू शकते की जर मला हे शक्य झालं तर कोणालाही सहज शक्य होईल. माझ्यावर विश्वास ठेवा दिवसातून स्वत:साठी एक किंवा दोन तास काढून व्यायाम केला तर तुमच्या शरीराबरोबरच मनावरही या वर्कआऊटचा परिणाम जाणवेल.’ या पोस्टबरोबर सानियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती व्यायाम करताना दिसत आहे. हा व्हिडिओ मी आई झाल्यानंतर साधारण अडीच महिन्यानंतरचा आहे असं तिने म्हटलं आहे.
‘‘कारकीर्दीत मी सर्व काही साध्य केले आहे. आता यापुढील विजेतेपदांची कमाई म्हणजे माझ्यासाठी बोनस असणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्यातच पुनरागमन करण्याचा माझा विचार होता, पण आता जानेवारी महिन्यात मी कुठल्याही परिस्थितीत कोर्टवर परतणार आहे. माझा मुलगा इझान हा माझ्यासाठी प्रेरणादायी असून टेनिसवर प्रचंड प्रेम असल्यामुळेच मी पुनरागमन करण्याचा विचार केला,’’ असेही सानियाने याआधीच स्पष्ट केलं आहे. जोरदार सराव सुरु असला तरी मातृत्वाच्या दोन वर्षांच्या रजेनंतर पूर्णपणे तंदुरुस्त होऊनच कोर्टवर उतरण्याचा सानियाचा इरादा आहे. ‘‘माझे शरीर कसे साथ देत आहे, याचे चित्र पुढील दोन महिन्यांत स्पष्ट होईल. मी पूर्णपणे तंदुरुस्त होत नाही, तोपर्यंत स्पर्धामध्ये सहभागी होणार नाही. पुन्हा कोर्टवर अवतरून जायबंदी होणे मला आवडणार नाही. सेरेना विल्यम्ससारखी खेळाडू आई झाल्यानंतरही ग्रँडस्लॅम स्पर्धाचे विजेतेपद पटकावत आहे, हे माझ्यासाठी खरोखरच प्रेरणादायी आहे,’’ असेही सानियाने म्हटलं होतं.