Satara Selfie Accident: एकीकडे मोबाईलने जग जवळ आले असले तरी रील्स बनविण्याच्या नादात भलतेच साहस अनेकांच्या जीवावर बेतू लागले आहे. काही दिवसांपूर्वी इन्फ्लुएन्सर अन्वी कामदार हिचा रायगड जिल्ह्यातील ३०० फूट दरीत कोसळून मृत्यू झाला होता. दरम्यान, साताऱ्यातही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. सेल्फीच्या नादात तरुणी २५० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेचा सध्या समोर आलेला थरारक व्हिडीओ पाहून तुमचीही झोप उडेल. बदलत्या जगात सोशल मीडियावर सक्रिय राहणे ही काळाची गरज बनत चालली आहे. प्रत्येक जण हा सोशल मीडियावर सक्रिय आहे. मग ते प्रत्येक क्षणाचे फोटोज सोशल मीडियावर टाकणे असो किंवा वारंवार सेल्फी काढणे असो. कधी कधी आपण लाइक्स आणि व्ह्युजच्या नादात अशा काही करामती करतो की, ज्यामुळे आपल्याला इतर अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते. त्यामध्ये एखाद्या वेळी आपला जीवही जाऊ शकतो. अशीच घटना या तरुणीसोबत घडली; मात्र पुढे जे घडले ते चमत्कारापेक्षा कमी नाही..

सेल्फी काढताना मुलगी २५० फूट दरीत कोसळली

सज्जनगड-ठोसेघर परिसरातील बोरणे घाटात आज एक युवती डोंगराच्या कडेला सेल्फी काढताना तोल जाऊन २५० फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने ती ४० फुटांवरच एका झाडीत अडकली आणि त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. ट्रेकर्समुळे तिला दुसरं आयुष्य मिळालंय. सज्जनगड-ठोसेघर मार्गावरील बोरणे गावाच्या हद्दीतील ‘मंकी पॉईंट’ परिसरात एक युवती सेल्फी काढत होती. यावेळी ही दुर्घटना घडली. सातारा शहरानजीकच्या डोंगर भाग परिसरातील हा दुसरा अपघात आहे. ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समिती व सातारा तालुका पोलिसांनी वेगाने बचावकार्य राबवून दरीत पडलेल्या युवतीला वाचवले. त्या युवतीला महाबळेश्वर टेकर्स व शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने सहिसलामत बाहेर काढून साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

थरारक रेस्क्यू ऑपरेशन

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, २५० फूट खोल दरीत कोसळताना सुदैवाने ती ४० फुटांवरच एका झाडीत अडकली. यावेळी विमोचन पथकाचे (रेस्क्यू टीमचे) सदस्य तिला वर घेऊन येताना दिसत आहेत. यावेळी ती युवती जखमी झाली असून, तिला नीट उभे राहणेही जमत नसल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. वर येतानाच ती दोन वेळा पुन्हा खाली पडताना ओरडताना दिसत आहे. यावेळी विमोचन पथकातील सदस्यांनी स्वत:च्या जीवाची बाजी लावून या युवतीला बाहेर काढले आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “आयुष्य एवढं सहज मिळतं का ?” रीलसाठी तरुणानं उंच इमारतीवरुन मारली उडी; पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का

सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती तथा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील धबधबे, पर्यटनस्थळे व धोकादायक धरण परिसरात जाण्यास पर्यटकांना सक्त मज्जाव केला आहे. मात्र, अशा पर्यटनस्थळांवर युवक-युवती, महाविद्यालयीन विद्यार्थी व पर्यटक पोलिसांचा डोळा चुकवीत हे सर्व नियम धाब्यावर बसवून जातात. मग आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अशा दुर्घटना समोर येतात. नुकतीच कास पठारावर स्कॉर्पिओ कार दरीत कोसळून एक जण ठार, तर सहा जण जखमी झाले होते.