सौदी अरेबियात राहणाऱ्या महिलांच्या दृष्टीनं २४ जून हा दिवस खऱ्या अर्थानं खास ठरला आहे. अनेक नियमांच्या रुढी, परंपरा, राग, द्वेषाच्या बंधनात अडकलेल्या महिलांना आजपासून गाडी चालवण्याची मुभा देण्यात आली आहे. अजून अनेक महत्त्वाचे बदल या देशात घडायचे आहेत. पण हे स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीनं टाकलेलं पहिलं पाऊल समजलं जात आहे.

गेल्या वर्षी २७ सप्टेंबरला सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी स्त्रियांवर वाहन चालवण्यासाठी घालण्यात आलेली बंदी उठवत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यांच्या या निर्णयाचं जगभरात कौतुक होत असलं तरी सौदीतील कट्टरपंथीयांनी मात्र प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. पण या विरोधाला भीक न घालता प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.

सौदी जगातील श्रीमंत देश असला तरी अनेक बाबतीत येथे स्त्रियांवर कडक बंधने घालण्यात आली होती. घरात गाडी असून अनेक महिलांना ती चालवण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे घराबाहेर पडण्यासाठी महिलांना घरांतील पुरुषांवर किंवा टॅक्सी चालकांवर अवलंबून राहावं लागत होतं. पण आता मात्र त्या स्वत: ड्राइव्ह करु शकणार आहेत. वाहन चालवण्याचं प्रशिक्षण घेऊन वाहतूक परवाना असलेल्या महिलांना वाहनं चालवता येणार आहेत. महिलांच्या दृष्टीनं हा नक्कीच ऐतिहासिक निर्णय आहे त्यामुळे अनेक महिलांनी या निर्णयाचं स्वागत करत आनंद साजरा केला आहे.