राज्यामधील विधानसभेच्या निकालाला १४ दिवस उलटून गेल्यानंतरही राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. भाजपाने वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे युतीतील सर्वात मोठा मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेने निवडणुकीआधी ठरलेल्या ५०-५० सुत्रानुसार अडीच वर्ष मुख्यमंत्री पद शिवसेनेला देण्याच्या मागणीवर अडून बसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे राज्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता लक्षात घेता सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांमध्ये फूट पडू नये वेगवेगळ्या उपाययोजना करताना दिसत आहेत. मात्र याचवरुन एकमजेशीर प्रकार उघडकीस आला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात निवासस्थान ‘मातोश्री’वर शिवसेनेच्या सर्व विजयी उमेदवारांची बैठक पार पडली. सकाळी साडेअकरा वाजता ही बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांची भूमिका आम्हाला मान्य असून त्यांच्या भूमिकेनुसार वाटचाल करणार असल्यावर शिवसेनेच्या आमदारांचे एकमत झाल्याचे समजते. दरम्यान या बैठकीनंतर आमदारांमध्ये फूट पडू नये यासाठी यासाठी शिवसेनेचे सर्व आमदार एकत्रित ट्रायडंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणार असल्याचे वृत्त समोर आले. असं असलं तरी यावरुनच एका भाजपा समर्थक महिलेने ‘पेटा इंडिया’ला टॅग करुन शिवसेनेला टोला लगावला. मात्र या मजेशीर ट्विटला ‘पेटा’ने खरोखरच रिप्लाय केला आहे.

काय होतं ट्विट

पुनिता तोरसकर या भाजपा समर्थक युझरने ट्विट करुन ट्रायडंटमध्ये ५५ वाघ अडकल्याचे म्हटले. “प्रिय पेट इंडिया, ट्रायडंट हॉटेलमध्ये ५५ उपाशी वाघ कोंडून ठेवले आहे. तेही एका पिंजऱ्यामध्ये तीन. कृपया त्यांना वाचवा,” असे ट्विट पुनिता यांनी केले. यामधून त्यांना उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर शिवसेनेच्या ५५ आमदारांना ट्रायडंटमध्ये ठेवण्यात आले आहे असं सुचित करायचं होतं. या ट्विटचा अर्थ महाराष्ट्रातील नेटकऱ्यांना योग्य प्रकारे समजला असून इतरजण गोंधळलेले दिसत आहे.

मात्र या मजेशीर ट्विटला ‘पेटा’ने खरोखरच उत्तर दिले आहे. “तुम्ही आम्हाला आपत्कालीन क्रमांकावर फोन करु शकता किंवा तुम्ही आम्हाला तुमचा क्रमांक द्या आम्ही तुमच्याशी संपर्क साधतो,” असं उत्तर ‘पेटा’ने दिले आहे.

अर्थात ‘पेटा’ने दिलेले हे उत्तर हे ऑटो जनरेटेड उत्तर आहे. मात्र या राजकीय कोपरखळीवर ‘पेटा’ने दिलेल्या उत्तरामुळे या ट्विटची सोशल नेटवर्किंगवर चर्चा होताना दिसत आहे.