उत्तराखंडच्या चामोली येथील बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्गाजवळ भूस्खलन झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता पाताळगंगा लांगसी बोगद्याजवळ भूस्खलन झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही भूस्खलनाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. लांगसी बोगद्याजवळ झालेल्या भूस्खलनाचा व्हिडीओ लांबून चित्रीत केलेला आहे. या व्हिडीओमध्ये डोंगराचा मोठा भाग खाली कोसळत असल्याचे दिसत आहे. उत्तराखंड पोलिसांनी सदर व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला आहे. “बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्गावर पाताळगंगा लांगसी बोगद्याजवळ भूस्खलन झाल्यामुळे वाहतुकीस बंदी घालण्यात आली असून या रस्त्याने जाणे टाळावे”, असे आवाहन उत्तराखंड पोलिसांनी केले आहे.

भूस्खलनाचे भीतीदायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक लोक त्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एका युजरने म्हटले की, डोंगराळ भागात महामार्ग बांधल्यानंतर त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे का लावली जात नाहीत. हेलिकॉप्टरद्वारे डोंगराळ भागात झाडांचे बीज पसरवा आणि त्यानंतर परिणाम बघा. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, व्हिडीओमधील भूस्खलन अतिशय धक्कादायक असल्याचे दिसत आहे. आणखी एका युजरने म्हटले की, उत्तराखंडमध्ये हे काय झालंय, चारधाम रस्ता बांधला तेव्हा अशी परिस्थिती नव्हती.

मंगळवारीही उत्तराखंडमध्ये भूस्खलन झाल्याचा प्रकार घडला होता. जोशीमठ परिसरातील चंदू धार येथील परिसरात भूस्खलन झाले होते. या घटनेचाही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. डोंगराचा एक मोठा भाग रस्त्यावर कोसळल्याचे यामध्ये दिसत आहे. यावेळी रस्त्याच्या दोन्ही कडेला प्रवाशीही मोठ्या संख्याने उपस्थित असल्याचे दिसत आहे. उपस्थितांनी आपल्या मोबाइलमध्ये या घटनेचे चित्रीकरण केले आहे.

९ जुलै रोजी सोशल मीडियावर सदर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पावसाळ्यात अनेक पर्यटक उत्तराखंडमधीर दऱ्या-खोऱ्यात सहलीसाठी येत असतात. अशावेळी पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. “विकासासाठी आपण पर्वतांवर पाय ठेवला आणि आता पर्वत आपल्या विकासावर कोसळत आहे”, असे या युजरन म्हटले.