शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते खूप मौल्यवान असते. शाळेच्या दिवसात काही काळानंतर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते आणखी घट्ट होते. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात काही शिक्षकांसाठी खूप खास जागा असते. शिक्षक विद्यार्थ्यांना चांगल्या – वाईटातला फरक सांगतात. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद देतात आणि पुढे जाण्याची प्रेरणा देतात. यात काही शिक्षक हे असे असतात ते विद्यार्थ्यांना अगदी आपल्या मुलांसारखे समजून घेतात. त्यांचे लाड करतात. शिक्षण आणि विद्यार्थ्यांचे गोड नाते दाखवणारे अनेक व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावरही व्हायरल होतात. त्यातील काही ह्रदयाला भिडणारे असतात तर काही बालपणीच्या दिवसांची आठवण करून देणारे असतात. अशातच एक शिक्षिका आणि विद्यार्थिनींमधील एक अतिशय गोंडस व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर युजर्स त्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. यातील शिक्षिका आणि विद्यार्थीनींमधील मैत्रीपूर्ण नाते लोकांना खूप आवडले आहे.

शिक्षिका आणि विद्यार्थिनींचा सुंदर व्हिडीओ

तुम्ही शाळेत असताना अनुभवलं असेल की, शाळेत असे काही शिक्षक असतात, जे संपूर्ण वर्गाचे आवडते असतात. अशा शिक्षकांना विशेष प्रसंगी खूश करण्यासाठी विद्यार्थी कोणतीही कसर सोडत नाही. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शिक्षिका आणि विद्यार्थिनींमधील एक चांगला बाँड दिसून आला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनाही त्यांच्या बालपणीचे दिवस आठवले आहेत.

व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, विद्यार्थिनी त्यांच्या आवडत्या शिक्षिकेसाठी सरप्राईज प्लॅन करतात. यादरम्यान शिक्षिका वर्गात येते तेव्हा तिलाही समजते की विद्यार्थिनींनी तिच्यासाठी काही तरी सरप्राईज प्लॅन केलाय, यावेळी तिची नजर कॅमेऱ्यावर पडते आणि ती लाजून वर्गाबाहेरच थांबते. त्यानंतर विद्यार्थिनी तिला मोठ्या कष्टाने समजावून वर्गात आणतात. पुढच्याच क्षणी शिक्षिका वर्गात येते आणि एक विद्यार्थिनी तिला भेटवस्तू आणून देते. ही भेटवस्तू म्हणजे फोटोंचा कोलाज असतो, ज्याकडे पाहून शिक्षिका लाजून हसताना दिसते. यानंतर कॅमेरा पाहून ती पुन्हा आपला चेहरा हाताने लपवताना दिसली.

जगाला वाचवणारा स्पायडरमॅन चक्क गच्चीवर बसून बनवतोय पोळ्या; VIDEO पाहून युजर म्हणाले, “पळून दमला आता…”

हा व्हिडीओ @Gulzar_sahab नावाच्या इन्स्टा अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आमच्या शाळा किंवा कॉलेजमध्ये अशा शिक्षकाची गरज आहे, जो सर्वांच्या आवडीचा असेल.’

दरम्यान, अनेकांनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. व्हिडीओ पाहणाऱ्या एका युजरने लिहिले की, हे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील भावनिक बंध आहे. आणखी एका युजरने लिहिले की, चांगले शिक्षक नेहमीच विद्यार्थ्यांचे हिरो असतात.काही युजर्स कमेंटमध्ये म्हटले की, विद्यार्थिनी शाळेत मोबाईल कसा घेऊन आल्या.