Scorpio Driver Flees After Filling ₹6,000 Worth of Diesel: रात्री उशिरा एक काळ्या रंगाची आलिशान एसयूव्ही पेट्रोल पंपावर येते. चालक अगदी शांतपणे गाडीची टाकी फुल करण्यास सांगतो. सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू असतं. पण, काही क्षणांनी असं काही घडतं की, पेट्रोल पंपावरील कर्मचारी अक्षरशः अवाक् होतात. नेमकं काय झालं ते जाणून घ्या सविस्तर…

पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर चालक पैसे देईल, अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, पेमेंट मशीन आणण्यासाठी कर्मचारी मागे वळताच चालकानं क्षणाचाही विलंब न करता गाडी भरधाव वेगानं पुढे दामटली. काही सेकंदांतच गाडी पंपाबाहेर निघून गेली आणि कर्मचारी काही समजून घेण्याच्या आतच संपूर्ण प्रकार घडून गेला.

माहितीनुसार, संबंधित चालकानं गाडीमध्ये तब्बल सहा हजार रुपयांचे डिझेल भरून घेतले होते. एवढ्या मोठ्या रकमेचे इंधन भरल्यानंतर पैसे न देता पसार झाल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला.

घटना घडल्यानंतर एका कर्मचाऱ्याने धाडस दाखवीत मोटरसायकलवरून त्या गाडीचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, चालकाने इतक्या वेगाने गाडी पळवली की, त्याला पकडणे अशक्य झाले. इतकी घाई झाली होती की, कर्मचाऱ्याला डिझेलचा नोझलही व्यवस्थित काढता आला नाही.

त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. मात्र, तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. गाडीच्या पुढील बाजूला नंबर प्लेटच नव्हती, तर मागील नंबर प्लेटवर टेप चिकटवण्यात आली होती. त्यामुळे सीसीटीव्हीमध्ये वाहनाचा क्रमांक स्पष्टपणे दिसत नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

पेट्रोल पंप प्रशासनाने या प्रकरणाची लेखी तक्रार पोलिसांकडे दिली आहे. संबंधित चालकाचा शोध घेऊन नुकसानभरपाई मिळवून द्यावी, तसेच अशा प्रकारच्या फसवणुकीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. अनेकांनी या प्रकारावर आश्चर्य व्यक्त केले असून, लाखो रुपयांची आलिशान गाडी चालवणाऱ्या व्यक्तीने केवळ इंधनाचे पैसे टाळण्यासाठी अशी कृती का केली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियावर या घटनेवर विविध प्रतिक्रिया आणि विनोदी मीम्सही व्हायरल होत आहेत.

पोलिस आता सीसीटीव्ही फुटेज, वाहनाचे फोटो आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चालकाचा शोध घेत आहेत. पुढील तपासानंतर या प्रकरणामागील नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.

ही घटना दिल्लीलगतच्या हरियाणातील गुरुग्राम जिल्ह्यातील पटौदी-बिलासपूर रोडवरील एका पेट्रोल पंपावर २५ जूनच्या रात्री घडल्याची माहिती समोर आली आहे.

येथे पाहा व्हिडीओ