सध्या सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी अनेकजण वेगवेगळे रिल्स बनवताना पाहायला मिळतात. या रिल्सच्या नादात लोक अनेकदा आपला जीव धोक्यात घालण्यासही मागे पुढे पाहत नाही. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच रिल्सने अक्षरश: वेड लावलं आहे. या रिल्स बनवण्यामध्ये तरुण- तरुणींची संख्या मोठी आहे. आता सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
काही तरुणांना स्टंट करणं चांगलंच महागात पडलं आहे. रील्ससाठी नदीत उतरवलेली स्कॉर्पिओ पाण्यातच अडकल्याची पाहायला मिळालं आहे. त्यामुळे रील्स बनवणं तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना जम्मू-काश्मीरमधील सोनमर्गमध्ये घडली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
जम्मू-काश्मीरमधील सोनमर्ग येथे सोशल मीडियासाठी रील्स बनवण्याच्या नादात काही तरुणांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. रील शूट करण्याचा प्रयत्न करताना काही तरुणांनी आपली ‘स्कॉर्पिओ’ गाडी थेट नदीत नेली. मात्र, त्यानंतर ही कार पाण्यात अडकली. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.
कॅमेऱ्यासमोर स्टंट करण्याचा प्रयत्न करताना चालकाने एसयूव्ही नदीपात्रात नेली. यावेळी गाडी तिथेच अडकली, ज्यामुळे गाडीतील लोक नदीच्या मधोमध अडकून पडले आणि वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला. त्यानंतर घटनेची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांना मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनीही बचावकार्यात मदत केली आणि सर्वांनी मिळून गाडीतील लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं.
#Watch | SUV gets stuck in Nallah #Sindh during reported stunt attempt near Sonamarg
— Greater Kashmir (@GreaterKashmir) September 11, 2026
A Scorpio vehicle became stranded in Nallah Sindh near #Sonamarg after its occupants allegedly attempted a stunt. Police and locals launched a rescue operation to retrieve the vehicle. pic.twitter.com/GbFzTouW48
गाडीतील लोकांना कोणतीही दुखापत न होता सुरक्षितपणे वाचवण्यात आलं. तसेच स्कॉर्पिओ गाडी नंतर नदीतून बाहेर काढण्यात आली. पोलिसांनी चालकाची ओळख श्रीनगरमधील नवाकदल येथील रहिवासी मोहम्मद अशी पटवली, तर गाडीतील दुसऱ्या व्यक्तीची ओळख नसीर अशी पटली आहे. पोलिसांच्या मते व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करताना गाडी नदीत नेणं हा निष्काळजीपणा आहे. या घटनेच्या संदर्भात अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
