अन्नसुरक्षा ही केवळ नियमांपुरती मर्यादित नसून ती थेट नागरिकांच्या जीविताशी संबंधित जबाबदारी आहे. बाजारात विक्रीसाठी येणारा प्रत्येक खाद्यपदार्थ सुरक्षित आणि विषमुक्त असणे अत्यावश्यक आहे. मात्र, नफ्याच्या हव्यासापोटी किंवा निष्काळजीपणामुळे जेव्हा अन्नपदार्थांमध्ये गैरप्रकार केले जातात, तेव्हा तो केवळ कायद्याचा भंग नसून सार्वजनिक आरोग्याशी खेळ ठरतो. अशा प्रकारच्या घटनांमुळे अन्नसाखळीवरील विश्वास डळमळीत होतो आणि प्रशासनासोबतच विक्रेत्यांची जबाबदारी अधिक अधोरेखित होते. असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे ज्यामुळे अन्नसुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे.
फळांना किड लागून नये म्हणून अनेकदा औषधांची फवारणी केली जाते त्यामुळे बाजारातून आणलेली फळे धुऊन खाण्याचा सल्ला दिला जातो. पण मुंबईत एका फळविक्रेत्याने हद्दच पार केली आहे. फळांना उंदरांपासून वाचवण्यासाठी थेट उंदीर मारण्याचे औषध लावले जात असल्याचा आरोप दोन फळविक्रेत्यांवर करण्यात आला आहे. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तातडीची कारवाई करत संबंधित दुकान सील केले आणि दोघांना अटक केली.
स्थानिक रहिवासी कुणाल साळुंके यांनी लेखी तक्रार देत हा प्रकार समोर आणला. त्यांच्या म्हणण्यानुसार, फळांवर विषारी पदार्थ लावले जात असल्याचा संशय होता. घटनेचा व्हिडीओ पुरावा म्हणून पोलिसांकडे सादर करण्यात आला असून तो सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार. मालाड पोलीस ठाणे येथील पथकाने तक्रारीची दखल घेत तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत संबंधित विक्रेत्यांनी उंदरांपासून संरक्षणासाठी औषध वापरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या मते, “अन्नपदार्थांवर कोणताही विषारी घटक लावणे हे कायद्याने गुन्हा असून त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.”
या प्रकरणात मनोज कुमार केसरवानी आणि बिपिन केसरवानी यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आवश्यक असल्यास अन्न व औषध प्रशासनासारख्या संबंधित विभागांनाही या तपासात सहभागी केले जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
या घटनेनंतर परिसरात अस्वस्थता पसरली असून नागरिकांनी अन्नसुरक्षेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली आहे.

