‘शार्क टँक इंडिया’ या कार्यक्रमात दिसलेल्या अनेक उद्योजकांनी पुढे मोठं यश मिळवल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. साकेत सौरभ हे देखील अशा यशस्वी उद्योजकांपैकी एक आहेत. साकेत यांचा शार्क टँकमधील एपिसोड अद्याप प्रसारित व्हायचा बाकी आहे, तरी देखील त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर मोठी चर्चा होताना दिसत आहे. साकेत यांनी सोशल मीडियावर एक रील शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी खुलासा केला की, ते वर्षाला ५० लाख रुपयांच्या पॅकेजवर नोकरी करत होते. पण स्वतःचा फूड बिझनेस सुरू करण्यासाठी त्यांनी ही गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली.

हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना साकेत यांनी सांगितले की, २०१४ साली त्यांनी NIFT मधून पदवी मिळवली आणि त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला, जो नंतर दुसऱ्या एका कंपनीने विकत घेतला. त्या ब्रँडने त्यांना प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कामावर घेतले, आणि ते या नोकरीमधून वर्षाला जवळपास ५२ लाख रुपये कमवत होते.

पण साकेत यांना पुन्हा स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यामुळे त्यांनी गुरुग्राममध्ये नोकरी सांभाळत एक छोटा व्यवसाय सुरू केला. त्यांनी सांगितले की, तो एक ‘जेनेरिक कॅफे’ होता, जिथे ते सर्वकाही विकायचे. पण लवकरच त्यांनी कार्टच्या माध्यामातून म्हणजेच गाडीवरून मोमोजचा व्यवसाय करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरूवात केली. “त्या कार्टने चांगला व्यवसाय केला. आम्ही दररोज १० हजार ते १२ हजार रूपयांची विक्री करत होतो,” असे साकेत यांनी सांगितले.

“पहिल्या वर्षी आम्ही काही कार्ट सुरू केल्या. ही एक चांगली बाजू होती, पण कार्टचा व्यवसाय हा अनिश्चिततेचा होता. आम्हाला अनेक वेगवेगळ्या अडचणी आल्या… कधीकधी प्रशासनाकडून कार्ट हटवल्या जात, आमच्याकडे कर्मचार्‍यांची अडचण असे आणि कधीकधी हवामानाची साथ मिळत नसे. प्रत्यक्ष काम करत असताना अशी अनेक आव्हाने होती,” अशी आठवण साकेत यांनी सांगितली.

लवकरच साकेत यांच्या लक्षात आले की, जर त्यांना ५०० कोटी रुपयांचे व्यावसाय उभा करायचा असेल, तर तो फक्त कार्टच्या माध्यमातून शक्य नाही. त्यानंतर त्यांनी स्वतःचे स्टोअर्स सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांच्या या कल्पनेने मोठे रूप घेतले असून असून त्यांच्याकडे ४० मोमो कार्ट, २० छोटी आउटलेट्स आणि दोन क्विक-सर्व्हिस रेस्टॉरंट्स आहेत.

पैसा किती कमावतात?

त्यांच्या या व्यवसायातून होणाऱ्या कमाईबद्दल माहिती देताना साकेत म्हणाले की, “२०२३-२४ च्या आर्थिक वर्षात, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या फक्त तीन महिन्यांत आम्ही १६ लाख रुपये कमावले होते. गेल्या वर्षी आम्ही २.२ कोटी रुपये कमावले होते. या वर्षी आम्ही आधीच २.२ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून, या वर्षाच्या शेवटी आम्ही ३ कोटींपर्यंत पोहोचू. म्हणजेच, गेल्या अडीच वर्षांत आम्ही ५ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.”