Shark Tank Namita Thapar Video: उद्योजिका आणि एमक्युअर फार्मास्युटिकल्सची कार्यकारी संचालक नमिता थापर सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. नमिताने सातत्याने होत असलेल्या ऑनलाइन ट्रोलिंगला आता प्रत्युत्तर दिले आहे.

तसंच तिने द्वेषाविरुद्ध ठाम संदेश देत सर्व धर्मांमध्ये परस्पर आदर ठेवण्याचे आवाहन केले. तिचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पण, नमिता थापरला सोशल मीडियावर एवढं ट्रोल का केलं जातंय आणि नेमकं असं घडलं तरी काय ते जाणून घेऊया…

काही दिवसांपूर्वी नमिता थापरने इन्स्टाग्रामवर नमाजमुळे होणारे शारीरिक आरोग्य फायदे सांगणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. तिची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मोठी चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर हा वाद निर्माण झाला. या पोस्टनंतर तिला खूप ट्रोल केलं गेलं आणि यावरच प्रत्युत्तर म्हणून आता नमिताने एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तिने खडेबोल सुनावले आहेत.

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नमिता थापरने सांगितलं की, तिने हा व्हिडीओ सकाळी सुमारे ७:०० वाजता कामावर जाताना रेकॉर्ड केला. ट्रोलिंग आणि अपमानास्पद कमेंट्सना उत्तर देण्यासाठी तिने प्रवासात कार थांबवली आणि व्हिडीओ रेकॉर्ड केला. या कमेंट्स फक्त तिच्यावरच नव्हे तर तिच्या आईवरही केल्या जात होत्या. तसंच “मला सतत ‘र’ वरून शिवी दिली गेली,” असंही तिने सांगितलं. तिने स्पष्ट केलं की अशा परिस्थितीत शांत राहणे योग्य नाही, विशेषतः जेव्हा स्वाभिमान किंवा मूलभूत मानवी हक्कांवर आघात होतो. तसंच नमिताने हिंदू परंपरांवरही अनेक व्हिडीओ केल्याचं सांगितले.

‘शार्क टँक इंडिया’मधील भूमिकेमुळे प्रसिद्ध असलेल्या नमिताने ‘सेलेक्टिव्ह आऊटरेज’ म्हणजेच निवडक विरोधाचा मुद्दा उपस्थित केला. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून तिने सांगितलं की, धार्मिक प्रथांबद्दल तिच्या निरीक्षणांचा उद्देश फक्त आरोग्याच्या दृष्टीने आहे. तिने असंही सांगितलं की, “मी यापूर्वी सूर्यनमस्कार आणि योगासनांसारख्या हिंदू परंपरांवरही व्हिडीओ शेअर केले होते, पण त्यावर असा विरोध झाला नव्हता, ही विसंगती का आहे,” असा प्रश्न तिने उपस्थित केला. सर्व धर्मांना समान आदर मिळायला हवा असं सांगत तिने “R for Religion म्हणजे R for Respect” असे म्हटले.

सार्वजनिक आयुष्यात अनेक वर्षे राहिल्यामुळे ट्रोलिंगची सवय झाली असल्याचे तिने मान्य केलं. मात्र, यावेळी मर्यादा ओलांडली गेली आणि त्यामुळे तिने आवाज उठवला असं तिने सांगितले. तसंच नमिताने ‘अभिमानी भारतीय’ नागरिकांना अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं आवाहन केलं. चुकीच्या गोष्टींवर शांत राहिल्यास त्याला प्रोत्साहन मिळतं, असंही तिने नमूद केलं.

व्हिडीओच्या शेवटी तिने कर्माच्या संकल्पनेचा उल्लेख केला. “देव पाहत आहे,” असे सांगत तिने ट्रोल करणाऱ्यांना इशारा दिला की द्वेष पसरवणाऱ्या कृती दुर्लक्षित राहत नाहीत. तसंच शेवटी ‘जय हिंद’ असं म्हणत नमिताने व्हिडीओचा शेवट केला.