खोल समुद्रात अगदी छोट्या माशांपासून ते मोठ्या माशांचं वास्तव असतं. पण माणूसच अनेकदा त्यांच्या क्षेत्रात अधिग्रहण करण्याचा प्रयत्न करत असतो. पाण्यातील भल्यामोठ्या शार्कच्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येतात, तर कधी अनेक जण शार्कच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावल्याच्या घटना पाहून अंगावर शहारे येत असतात. असाच शार्कचा आणि एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अमेरिकेतला आहे. अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये राहणारे एक कपल ब्रेवर्ड काउंटी बीचवर फिरण्यासाठी गेले होते. एली मॅक्डोनल्ड्स हा त्याची होणारी पत्नी लौरा ईवान्स सोबत समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन खेळत होते. त्यावेळी समुद्रात उसळणाऱ्या उंचच उंच लाटा पाहून एलीला समुद्रात पोहण्याचा मोह काही आवरता आला नाही. एली समुद्रात पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी गेला होता. त्याची होणारी पत्नी लौरा ही बीचवरून त्याचे व्हिडीओ शूट करत होती. एलीला समुद्रात आपल्या आजुबाजुला वेगळ्या प्रकारचे मासे दिसून आले. त्यांना अगदी जवळून पाहण्यासाठी तो पुढे गेला. इतक्यात त्याला तिथे एक भल्यामोठ्या शार्कसारखं काहीतरी दिसलं. आपल्या आजुबाजुला एक भलामोठा शार्क फिरतोय हे पाहून एली पुरता घाबरून गेला. यावेळी एक नाही, दोन नाही तर बऱ्याच शार्क्सनी एलीला चारही बाजुंनी घेरलं होतं. ही सर्व घटना त्याची होणारी पत्नी लौराच्या कॅमेऱ्याच कैद झाली.

हे पाहिल्यानंतरही बीचवर असलेली लौरा त्याला कोणत्याही प्रकारे शार्कबाबत इशारा देऊ शकत नव्हती. त्या पोहणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या बाजूला शार्कही आहे हे समजल्यानंतर एलीने थोडी जरी गडबड केली असती तर कदाचित हे शार्क्स त्याच्यावर हल्ला करण्यासाठी सज्ज झाले असते. पण प्रसंगावधान बाळगत एलीने या शार्क्सच्या घेरावातून कसाबसा बाहेर पडला आणि सुटकेचा श्वास घेतला. त्या व्यक्तीचं नशीब बलवत्तर की, शार्कने अगदी बाजूला असूनही त्यावर हल्ला केला नाही.

अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेचे काही दृश्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागले आहेत. surfnweatherman नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून याचे काही फोटोज शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर नेटिझन्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत समुद्रात पोहत असताना काळजी घेण्याचं आवाहन देखील करत आहेत.