Wife Jumps into Well After Husband Dispute: पती-पत्नीमध्ये भांडण होणं ही काही नवीन गोष्ट नाही. कधी छोट्या कारणावरून वाद होतो, तर कधी एखादी गोष्ट मनाला लागल्यामुळे राग अनावर होतो. मात्र, एका दाम्पत्यातील वादाने असं वळण घेतलं की, ते पाहून घटनास्थळी उपस्थित असलेले लोकही घाबरले. रागाच्या भरात पत्नीने थेट खोल विहिरीत उडी घेतली. तिला वाचवण्यासाठी पतीने तातडीने प्रयत्न सुरू केले. विहिरीत दोरी टाकून तिला बाहेर येण्यास सांगितले. महिलेने दोरी पकडलीही; पण बाहेर येण्यास मात्र स्पष्ट नकार दिला. त्यानंतर तिने अशी अट घातली की अखेर पतीला सर्वांसमोर हात जोडावे लागले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरत आहे.
पत्नी विहिरीत उतरली, पतीने वाचवण्यासाठी प्रयत्न केले; पण तिने ऐकलं नाही!
मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये बुधवारी दुपारच्या सुमारास कोणत्यातरी कारणावरून वाद झाला होता. या वादामुळे पत्नी प्रचंड संतापली आणि जवळच असलेल्या खोल विहिरीत तिने उडी घेतली. पत्नी विहिरीत पडल्याचे पाहताच पतीही तातडीने तिच्या मदतीसाठी धावला. तिला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी त्याने विहिरीत दोरी सोडली. महिलेने दोरी पकडली; मात्र तिने विहिरीतून बाहेर येण्यास नकार दिला.
दरम्यान, ही घटना गावात पसरताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमू लागली. विहिरीत असलेल्या महिलेला सुरक्षित बाहेर कसे काढायचे, असा प्रश्न उपस्थितांसमोर निर्माण झाला. तिच्या कुटुंबीयांचीही चिंता वाढली. महिलेने बाहेर येण्यासाठी नकार दिल्याने तिला समजावण्याचे प्रयत्न सुरू झाले. तिला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी दोरीच्या मदतीने खाट विहिरीत उतरवण्याची व्यवस्थाही करण्यात आली. मात्र, महिला आपल्या भूमिकेवर ठाम होती.
‘आधी सर्वांसमोर माफी मागा, मगच बाहेर येईन!’
या संपूर्ण प्रकारातील सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे, पत्नीने विहिरीतून बाहेर येण्यासाठी पतीसमोर एक अट ठेवली. जोपर्यंत पती गावकऱ्यांसमोर तिची माफी मागत नाही, तोपर्यंत आपण बाहेर येणार नाही, अशी भूमिका तिने घेतली. घटनास्थळी उपस्थित असलेले लोक तिला वारंवार समजावण्याचा प्रयत्न करत होते, मात्र ती कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हती.
अखेर परिस्थिती लक्षात घेऊन पतीने गावकऱ्यांसमोर हात जोडले आणि पत्नीची माफी मागितली. त्यानंतरच महिला विहिरीतून बाहेर येण्यास तयार झाली. या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांचे लक्ष विहिरीकडे लागले होते. महिलेला बाहेर काढण्याच्या या प्रयत्नांमुळे काही काळ गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण बचावकार्याला नेमका किती वेळ लागला, याबाबत वेगवेगळी माहिती समोर आली आहे. काही वृत्तांनुसार, बचावकार्य सुमारे अर्धा तास सुरू होते.
घराला कुलूप लावण्यावरून झाला होता वाद?
महिलेने विहिरीत उडी घेण्यामागील कारणही समोर आले आहे. पती जेव्हा घराबाहेर जायचा तेव्हा तो घराच्या दरवाजाला कुलूप लावून जात असे. याच गोष्टीवरून ती नाराज होती असे सांगितले जात आहे. या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे.
ही घटना मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील दिनारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सहरिया गावात घडल्याचे वृत्त आहे. दिनारा पोलिस ठाण्याचे प्रभारी सुधीर कुशवाहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अद्याप पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितल्याचे वृत्तांत नमूद आहे.
येथे पाहा व्हिडीओ
या घटनेचा व्हिडीओ चर्चेत असला, तरी रागाच्या भरात जीव धोक्यात घालणारे पाऊल उचलणे किती गंभीर ठरू शकते हे या प्रसंगातून दिसून येते. पती-पत्नीमधील मतभेद संवादातून सोडवणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही वादात स्वतःच्या जीवाला धोका निर्माण होईल असे कृत्य टाळणे आवश्यक आहे.
