Vinod Kambli video viral: सध्या सोशल मीडियावर विनोद कांबळी यांचे नाव चर्चेत आले आहे. एकेकाळी विनोद कांबळी या नावाचा क्रिकेटविश्वात मोठा दबदबा होता. कारण- सर्वांत जलद कसोटी क्रिकेटमधील धावांचा विक्रम त्यांच्या नावावर होता. पण, दारूचं व्यसन त्यांना लागलं आणि कोण होतास तू, काय झालास तू… असं त्यांच्याबाबत घडलं. सचिन तेंडुलकर यांच्याबरोबर त्यांनी शालेय क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचला होता. भारतीय संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी यांची स्थिती अतिशय खराब झाली आहे. एकेकाळी स्टार असणाऱ्या कांबळींना आज चालताही येईना. विनोद कांबळींचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही शॉक व्हाल. भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा जीवलग मित्र मानल्या जाणाऱ्या विनोद कांबळी यांचा एक व्हिडीओ सध्या सोधल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विनोद कांबळी यांना नीट चालताही येत नाहीये. एकेकाळी कोट्यवधी रुपयांची कमाई करणाऱ्या विनोद कांबळींना आज एक-एक रुपया महाग झाला आहे. इतकेच काय, तर त्यांची परिस्थिती इतकी दयनीय झालीय की, त्यांना चालताही येईना. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विनोद कांबळी यांना योग्य पद्धतीनं उभंदेखील राहता येत नाहीये. यावेळी उभं राहण्यासाठी त्यांना बाईकचा आधार घ्यावा लागतोय. यावेळी जेव्हा ते चालायचा प्रयत्न करतात, त्यावेळी आजूबाजूला असलेल्या लोकांनी त्यांना आधार दिला आणि उचलून त्यांना बाजूला नेलं. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाईट वाटेल. विनोद कांबळींना नेमकं काय झालं? विनोद कांबळींना नेमकं काय झालं? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. पण, सोशल मीडिया रिपोर्ट्सनुसार, मागील काही दिवसांपासून विनोद कांबळींची प्रकृती बिघडलीय. काही दिवसांपूर्वी पांढरे केस आणि हात जोडत असलेला विनोद यांचा फोटो व्हायरल झाला होता. आपल्याकडे कोणताच जॉब नाही आणि त्यामुळे घर चालवणं कठीण होऊन बसलं आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. एकेकाळी विनोद हे अनेकांच्या गळ्यातील ताईत होते. पण, आता त्यांच्यावर दारूच्या व्यसनामुळे ही वेळ आली आहे. पाहा व्हिडीओ हेही वाचा >> VIDEO: पुणेकरांनो ट्रेकिंगला जाताय? पाण्याचा प्रवाह कसा वाढला पाहा; अडकलेल्या तरुणाची अवस्था पाहून घाम फुटेल काही वर्षांपूर्वी विनोद कांबळी आर्थिक संकटात सापडले असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी पुढाकार घेत त्यांना मदत केली होती. सचिन यांनी त्यांची एका अकादमीत प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. याशिवाय ते मुंबई टी-२० लीगमध्ये टीमचे प्रशिक्षकही झाले. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली आणि त्यामुळे त्यांना प्रशिक्षकपदाची नोकरी गमवावी लागली.