Lioness Hunting Cow: जंगलातील प्रत्येक क्षण हा रोमांचक असतो; पण कधी कधी हा रोमांच थेट भीतीत बदलतो, हे कोणालाच कळत नाही. गुजरातमधील प्रसिद्ध गीर या राष्ट्रीय उद्यानात सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांसोबत नुकताच असाच एक थरारक प्रसंग घडला. जंगल सफारीचा आनंद घेत असताना पर्यटकांच्या अगदी काही फुटांवर सिंह आणि सिंहिणीनं जिवंत शिकार केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे सिंहिणीने शिकार करण्यासाठी सफारी जीपचाच जणू आडोसा घेतल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हे दृश्य इतकं जवळून घडलं की, काही क्षण पर्यटकही स्तब्ध झाले.
सुरुवातीला सगळं शांत… पण अचानक बदललं वातावरण
गुजरातमधील सासन गीर या निसर्ग सफारी पार्कमध्ये पर्यटक जंगल सफारीचा आनंद घेत होते. सुरुवातीला वातावरण अगदी शांत होतं. काही पर्यटक मोबाईल आणि कॅमेऱ्यात सिंहांच्या कळपाचे फोटो टिपत होते; मात्र काही क्षणांतच जंगलातील वातावरण पूर्णपणे बदललं.
व्हिडीओमध्ये एक सिंह आणि सिंहीण अतिशय सावधपणे पुढे सरकत असल्याचं दिसतं. त्यांच्या हालचाली पाहून काहीतरी मोठं घडणार असल्याची चाहूल लागत होती. सिंहिणीनं अत्यंत हुशारीनं सफारी जीपच्या बाजूला आपली जागा घेतली आणि अचानक विजेच्या वेगानं समोर असलेल्या नीलगाईवर झडप घातली.
अवघ्या काही सेकंदांत संपला खेळ
सुमारे ५६ सेकंदांच्या या व्हायरल व्हिडीओमध्ये जंगलातील क्रूर वास्तव स्पष्ट दिसतं. सिंहिणीनं क्षणार्धात आपल्या शिकारीला पकडलं. त्या क्षणी उपस्थित पर्यटक अक्षरशः श्वास रोखून हे दृश्य पाहत होते.
काही जण भीतीने शांत बसले होते; तर काहींनी हा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद केला. जंगलातील हा थरार इतक्या जवळून पाहण्याचा अनुभव अनेकांसाठी आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला.
वन्यजीव तज्ज्ञही म्हणाले – असे प्रसंग दुर्मीळ
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, सफारी वाहनांच्या इतक्या जवळून सिंहांकडून जिवंत शिकार केली जाणं अत्यंत दुर्मीळ मानलं जातं. त्यामुळेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
जंगलात सिंह हा सर्वोच्च शिकारी मानला जातो आणि त्याची शिकार करण्याची पद्धत अत्यंत रणनीतीपूर्ण असते. या व्हिडीओत सिंहिणीची शांत हालचाल, योग्य वेळ साधणं आणि क्षणार्धात हल्ला करणं हे दृश्य अगदी स्पष्ट दिसतं.
सोशल मीडियावर प्रतिक्रियाांचा पूर
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
एका युजरनं लिहिलं, “नॅशनल जिओग्राफिकमध्ये पाहायचे प्रसंग आज प्रत्यक्ष पाहायला मिळाले.” तर दुसऱ्यानं म्हटलं, “जंगलाचा खरा राजा शिकार कसा करतो, हे आज समजलं.”
काहींनी, “त्या क्षणी त्यांच्या हृदयाचे ठोके नक्कीच वाढले असतील,” या शब्दांत पर्यटकांबाबतही सहानुभूती व्यक्त केली.
येथे पाहा व्हिडीओ
जंगल म्हणजे निसर्गाचं खरं रूप
गीरचे जंगल हे भारतातील आशियाई सिंहांसाठी प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी हजारो पर्यटक सफारीसाठी येतात. मात्र, हा व्हिडीओ पुन्हा एकदा दाखवून देतो की, जंगलात प्रत्येक क्षणी निसर्गाचे नियम चालतात. तिथे सौंदर्य आहे, रोमांच आहे आणि त्याचसोबत भीतीदायक वास्तवही आहे.
