Father Son Viral stunt video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही हसवतात, काही रडवतात, तर काही विचार करायला भाग पाडतात. पण काही व्हिडीओ असेही असतात, जे पहिल्या नजरेत भावनिक वाटले तरी त्यामागे दडलेला धोका लक्षात आला की अंगावर काटा येतो. निरागसतेच्या नावाखाली किंवा प्रेमाच्या आड लपून जेव्हा एखादी कृती थेट जीवावर बेतू शकते, तेव्हा ती केवळ भावुक क्षण न राहता गंभीर प्रश्न बनते. सध्या व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ नेमकं हेच चित्र दाखवत आहे. लहान बाळाचा विश्वास, वडिलांचा आत्मविश्वास आणि एका क्षणात घडू शकणारी मोठी दुर्घटना—या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये साधारण दोन वर्षांचा एक लहान मुलगा घराच्या बाल्कनीत उभा असल्याचं दिसतं. खाली त्याचे वडील जमिनीवर उभे आहेत. त्यांनी दोन्ही हात वर करून मुलाला उडी मारायला सांगितलं आहे. खाली गादी टाकलेली असली तरी बाल्कनीची उंची पाहता हा प्रकार खूपच धोकादायक वाटतो.सुरुवातीला मुलगा खाली पाहतो, थोडा घाबरतो आणि मागेही सरकतो.
पण वडील “मी आहे, काही होणार नाही” असा दिलासा देतात. त्यामुळे मुलगा पुन्हा पुढे येतो आणि थोडा विचार करून थेट बाल्कनीतून खाली उडी मारतो. सुदैवाने वडील त्याला लगेच पकडतात आणि मोठा अपघात टळतो.जर वडिलांच्या हातातून मुलगा निसटला असता, पाय घसरला असता किंवा तो नीट पकडता आला नसता, तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. हा व्हिडीओ @virjust18 या एक्स (ट्विटर) अकाउंटवर शेअर करण्यात आला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक युजर्स भावूक झाले असून “बाळाचा विश्वास पाहून डोळ्यांत पाणी आलं”, “माझ्या बाबांची आठवण झाली” अशा भावना व्यक्त करत आहेत. मात्र, मोठ्या संख्येने लोकांनी संताप व्यक्त करत हा प्रकार थेट लेकराच्या जीवाशी खेळ असल्याचं म्हटलं आहे.
“हे प्रेम नाही, निष्काळजीपणा आहे”, “एका व्हायरल व्हिडीओसाठी मुलाचं आयुष्य धोक्यात घालणं चुकीचं आहे”, “असा स्टंट कोणीही कॉपी करू नये” अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. काहींनी तर पालकांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. भावनिक वाटणारा हा व्हिडीओ प्रत्यक्षात किती धोकादायक असू शकतो, याची जाणीव करून देणारा ठरत असून सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी मुलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केलं जात नाही ना, हा प्रश्न पुन्हा एकदा समोरआला आहे.

