Mathura Boat accident video: वृंदावनमध्ये पर्यटकांना घेऊन जाणारी बोट शुक्रवारी दुपारी यमुना नदीत उलटली. या दुर्घटनेत किमान दहा जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बेपत्ता आहेत. बोटीवरील सर्व पर्यटक पंजाबमधील होते. एका क्षणी भजनं गात असलेल्या पर्यटकांच्या ओठी पुढच्याच क्षणी किंकाळ्या आणि आरडाओरडा आला. मृत्यूच्या काही क्षण आधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल..

याआधीही सोशल मिडियावर या अपघाताचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात लोक नदीत बुडताना आणि मदतीसाठी आक्रोश करताना दिसून आले. अशातच आता मात्र इथे आणखी एक दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो अपघाताच्या काही वेळाआधीचा असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये लोक बोटीत बसून पाण्याच्या सफरचा आनंद लुटताना दिसले. अनेक लोक यावेळी देवाचे नाव घेत भजन गाण्यात मग्न होते. गाताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता पण काही वेळातच त्यांचा हा आनंद अशा दुःखात बदलला ज्याचा कुणी विचारही केला नसावा.

वृंदावनचे सर्कल ऑफिसर पीतम पाल सिंग म्हणाले, “लुधियानामधून ३० हून अधिक भाविकांचा एक गट बसने वृंदावनला आला होता. त्यातील काही जण नौकाविहारासाठी गेले असताना हा अपघात घडला. आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून त्यातील काही जण लुधियानाचे आहेत. पाच जण बेपत्ता आहेत आणि इतर अनेकांना सुखरुप वाचवण्यात आले आहे. बचावकार्य अजूनही सुरु आहे.”

पाहा व्हिडीओ

एका क्षणी ओठी भजनं, पुढच्याच क्षणी किंकाळ्या

‘बांके बिहारी क्लब’ने सलग चौथ्या वर्षी ९ ते १२ एप्रिल दरम्यानच्या या सहलीचे आयोजन केले होते. लुधियाना आणि जग्राँ येथील रहिवाशांचा समावेश असलेला हा ग्रुप गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास बसने रवाना झाला आणि शुक्रवारी सकाळी वृंदावनला पोहोचला. यमुनेच्या काठावरील ‘केशी घाटा’वर जाण्यासाठी त्यांनी दोन बोटी घेतल्या; त्यापैकी एक बोट पाण्यावर तरंगणाऱ्या एका तरंगत्या फलाटाला धडकल्यामुळे उलटल्याचे सांगितले जात आहे. मृतांपैकी बहुतांश व्यक्ती लुधियाना येथील आहेत. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “देवालाही दया आली नाही”