Viral video: जगातील सर्वात सुंदर नातं म्हणजे आई आणि लेकरांचं. आपल्या जिवापलीकडे लेकरांची काळजी घेणारी असते ती आई. म्हणूनच आईचं प्रेम हे अभाळमाया आणि सागराएवढं विस्तीर्ण असतं. मात्र, माय-लेकराच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. ‘माता न तू वैरिणी…’ या उक्तीचा प्रत्यय देणारी संतापजनक घटना सध्या व्हिडीओ व्हायरल होतोय. फरीदाबादमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली असून दीड वर्षाच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणात जे सत्य समोर आलं आहे त्याने सर्वांनाच हादरवून सोडलं. नाल्यात सापडलेल्या मुलीच्या मृतदेहाच्या तपासादरम्यान असं समोर आलं आहे की, १८ महिन्यांच्या या चिमुकलीला दुसऱ्या कोणी नाही तर तिच्या जन्मदात्या आईनेच नाल्यात फेकून दिलं होतं. पाण्यात बुडाल्यामुळे या मुलीचा मृत्यू झाला.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या घटनेपूर्वीचं एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे, ज्यामध्ये ती महिला मुलीला कडेवर घेऊन जाताना दिसत आहे, मात्र परत येताना मुलगी तिच्या कडेवर नसते. याच पुराव्याच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता हे सत्य उघड झालं.हे संपूर्ण प्रकरण तीन दिवसांपूर्वीचं आहे, जेव्हा पल्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धीरज नगर आणि टीटू कॉलनी पार्ट-२ दरम्यान वाहणाऱ्या नाल्यात एका चिमुकलीचा मृतदेह सापडला होता. स्थानिक लोक ज्याला ‘बुढिया नाला’ म्हणतात, त्या नाल्याच्या कडेला असलेल्या लोखंडी जाळीत मुलीचा मृतदेह अडकलेला आढळला होता. सर्वात आधी दोन शाळकरी मुलांनी हा मृतदेह पाहिला आणि आसपासच्या लोकांना माहिती दिली, त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं.

आईनेच मुलीला नाल्यात फेकलं

पोलीस तपासात असं स्पष्ट झालं की, मुलीला नाल्यात फेकलं गेलं. मुलगी ही कुटुंबातील सहावी मुलगी होती, तिला आधी पाच मोठ्या बहिणी आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक चणचण आणि हलाखीची परिस्थिती हे या भयानक कृत्यामागचं कारण समोर आलं आहे. मुलीचे आई-वडील धीरज नगरमधील झोपडपट्टीत राहतात, जिथे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही यावर संताप व्यक्त करत आहेत. त्या आईवर कठोर कारवाईची मागणी आता मोठ्याप्रमाणावर होत आहे.