bungee jumping shocking video: अतिशय साहसी व थरारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक लोकांचे बंजी जंपिंगसारख्या अॅडव्हेंचर स्पोर्टसमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. मागील काही दिवसांत ऋषिकेश येथे बंजी जंपिंगदरम्यान गंभीर जखमी झालेल्या गुरुग्रामच्या युवकाच्या घटनेने देशभरात चर्चा रंगली होती.

त्याच संबंधित आता पुन्हा एक धक्कादायक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एका २० ते २२ वर्षांच्या तरुणीने बंजी जंपिंग केल्यानंतर हवेतच जीव गमावल्याचे दिसते. त्यामुळे हा प्रकार खरा की बनावटी याबद्दल नेटिझन्समध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका तरुणीच्या बंजी जंपिंगच्या तयारीपासून सुरू होतो. उंच डोंगराळ परिसर, खाली दिसणारी खोल दरी आणि आजूबाजूला पूर्ण शांतता, अशा वातावरणात थरार निर्माण करणारा सेटअप दिसतो. तरुणीने हेल्मेट परिधान केले आहे आणि सुरक्षा दोरींनी तिला व्यवस्थित बांधलेले दिसते. व्हिडीओ शेअर करणाऱ्या अकाउंटमध्ये दावा केला गेला आहे की, जंप केल्यानंतर तरुणीला हवेतच हार्ट अटॅक आला.

व्हिडीओमध्ये तरुणी प्लॅटफॉर्मवर उभी राहून जंपसाठी तयारी करताना दिसते. थोड्याच क्षणांत ती उंचावरून झेप घेते. सुरुवातीच्या काही सेकंदांपर्यंत सर्व काही सामान्य दिसत असले तरी अचानक तिचे शरीर पूर्णपणे सैल पडते आणि तिची कोणतीही हालचाल दिसत नाही. ती हवेतच बेशुद्धा झालेली दिसते .

व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या अकाउंटने याला ‘हार्ट अटॅक’ असल्याचा दावा केला असला तरी त्याची कोणतीही खरी माहिती आढळत नाही. तरुणी जिवंत आहे की नाही याबद्दलही कुठली ठोस माहिती उपलब्ध नाही. पुढच्या दृश्यात परिसरातील केअरटेकर किंवा स्टाफ धावत येताना आणि तिला तपासून पाहताना दिसतात. त्यामुळे प्रेक्षकांची भीती आणि कुतूहल अधिक वाढले आहे.

पाहा व्हिडिओ

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील sunny_editts01 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, लाखो लोकांनी तो पाहिला आहे; पण वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया मात्र एकसारख्या नाहीत. काहींनी हा व्हिडीओ खरा असल्याचे सांगितले असून, अशा खेळांमध्ये काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे; तर काहींनी सरळसरळ हा व्हिडीओ स्क्रिप्टेड असल्याचे म्हटले आहे.

एका युजरने लिहिले, “बाई खरंच बेशुद्ध झाली असती, तर तिच्या हातातील कोल्ड ड्रिंकचा कॅन पडला असता.” आणखी एका युजरने टोकाचे मत नोंदवले, “अशी हिंमत नसेल, तर अशा धोकादायक अॅडव्हेंचरला जाऊच नये.” काही जणांनी सरकारला अशा जोखमीच्या अॅडव्हेंचरला बंदी घालण्याची मागणी करावी, असेही म्हटले आहे.

या व्हिडीओची सत्यता अद्याप स्पष्ट झाली नसली तरी सोशल मीडियावर या प्रकारामुळे पुन्हा एकदा अॅडव्हेंचर स्पोर्टसच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.