Shocking Video: उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात एका धक्कादायक घटनेत, एका महिलेने तिच्या वडिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवला. बिलग्राम शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हरदोई येथील सांडी रोडवरील एचपी सीएनजी पेट्रोल पंपावर हा धक्कादायक प्रकार घडला आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पेट्रोल पंपावरील वाद (UP Woman Revolver Threatening Video)
मिळालेल्या माहितीनुसार, शहाबाद येथील रहिवासी एहसान खान रविवारी त्यांची पत्नी आणि मुलगी अरिबा खान हिच्यासह पेट्रोल पंपावर त्यांच्या गाडीत इंधन भरण्यासाठी पोहोचले होते. सीएनजी भरत असताना, एहसान खान आणि रजनीश कुमार नावाच्या पंप कर्मचाऱ्यामध्ये एका अज्ञात मुद्द्यावरून शाब्दिक बाचाबाची झाली. ही बाचाबाची लवकरच वाढत गेली आणि कर्मचाऱ्याने एहसानच्या छातीवर धक्का दिला, जे कॅमेऱ्यात कैद झाले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वडिलांना ढकलले जात असल्याचे पाहून संतापलेली मुलगी गाडीकडे धावत जाते, बंदूक घेते आणि थेट कर्मचाऱ्याच्या छातीवर रोखते असे दिसत आहे.
घटनास्थळी असलेल्या लोकांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि गोळीबार होण्यापूर्वीच परिस्थिती आटोक्यात आणली. प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मुलीने कर्मचाऱ्याला ओरडून धमकी दिली आणि म्हटले की, “इतनी गोलियां मारुंगी की घर वाले भी पहचाने से माना कर देंगे” (मी इतक्या गोळ्या झाडेन की तुमचे कुटुंबही तुमचा मृतदेह ओळखू शकणार नाही).
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @SachinGuptaUP या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला 442.3k व्ह्युज आले आहेत. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “काहीही असो, उत्तर प्रदेशात गोळीबार करणे हे सर्वात सोपे काम आहे.” तर दुसऱ्याने “किती दादागिरी सुरू आहे पाहा” अशी कमेंट केली.
तिघांविरुद्ध एफआयआर दाखल, बंदूक जप्त
या घटनेनंतर पेट्रोल पंप कर्मचारी रजनीश कुमार यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली. एहसान खान, त्यांची पत्नी हुस्नबानो आणि मुलगी अरिबा खान यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, या आरोपांमध्ये शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत आणि गुन्हेगारी धमक्या देण्याच्या कलमांचा समावेश आहे.
बिलग्राम पोलिस स्टेशनचे प्रभारी राकेश कुमार यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेत वापरलेली बंदूक जप्त करण्यात आल्याची पुष्टी केली. अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.