सोशल मीडियाच्या जगात व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही व्हिडीओ मनोरंजनासाठी पाहिले जातात, काही भावनिक प्रतिक्रिया निर्माण करतात, तर काही व्हिडीओ समाजासमोर गंभीर प्रश्न उभे करतात. विशेषतः स्टंट, धाडस किंवा ‘थरार’ दाखविणारे व्हिडीओ तरुणांमध्ये झपाट्याने पसरतात. मात्र, अशा व्हिडीओंचा प्रभाव केवळ पाहण्यापुरता मर्यादित राहत नाही; तर ते अनेकांना तसेच वागण्यास प्रवृत्त करू शकतात. त्यामुळेच अशा प्रकारच्या कंटेंटवर नेहमीच चर्चा, वाद आणि टीका होताना दिसते. अलीकडच्या काळातही असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून, त्यावरून सुरक्षितता, कायदा आणि जबाबदारी यासंबंधीचे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये पुण्यातील एक तरुणी चालत्या गाडीच्या बोनेटवर बसल्याचे दिसत आहे. ही गाडी एका पुलावरून जात असल्याचे स्पष्टपणे दिसते. विशेष म्हणजे गाडी वेगात असताना तरुणी अत्यंत बेफिकिरीने बोनेटवर बसलेली असून, तिच्या मागे फटाके फोडले जात आहेत. संपूर्ण प्रकार पाहता, हा स्टंट केवळ धोकादायकच नाही, तर अपघातास आमंत्रण देणारा आहे.

रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांसाठीही हा प्रकार जीवघेणा ठरू शकतो. व्हिडीओमध्ये सुरक्षेची कोणतीही काळजी घेतल्याचे दिसत नाही. ना सीट बेल्ट, ना हेल्मेट, ना इतर कोणतीही सुरक्षा व्यवस्था. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड होताच काही वेळातच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आणि अनेकांनी तो शेअर केला. मात्र, व्हायरल होण्यासोबतच या प्रकारावर तीव्र नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ

या व्हिडीओवर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक युजर्सनी या कृत्याला मूर्खपणाचे आणि बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे. एका युजरने प्रतिक्रिया देताना, पडली असती, तर धडा मिळाला असता, असा टोमणा मारला . दुसऱ्या एका प्रतिक्रियेत, “पैसा जास्त; पण अक्कल कमी आणि स्वतःला फार मोठं समजणं.” असे म्हणत श्रीमंती आणि अहंकारावर प्रतिक्रिया दिली.

तर काहींनी थेट कायदेशीर कारवाईची मागणी केली असून, “आतापर्यंत तिला अटक झाली पाहिजे होती.” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनेकांनी अशा स्टंट्समुळे तरुण पिढीवर होणाऱ्या वाईट परिणामांची चिंता व्यक्त केली. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या अशा कृत्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे मतही लोकांनी व्यक्त केले. हा व्हिडीओ केवळ व्हायरल होतानाच, सार्वजनिक सुरक्षितता आणि सोशल मीडियावरील जबाबदारी यावर गंभीर चर्चा घडवून आणणारा ठरला आहे.