Shocking video: आपल्या देशात आता स्त्री-पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात प्रगती करताना आपला ठसा उमटवताना दिसतात, असं आपण खरंच अभिमानानं सांगू शकतो का? पुरुषप्रधान संस्कृतीवर मात करुन स्त्रियांनी आपल्यातील धमक दाखवून देण्यासाठी मेहनत घेतली खरी. पण समाज म्हणून स्त्रियांना अजूनही समानतेची वागणूक मिळत नसल्याचं पुन्हा समोर येत आहे. सोशल मडियावर एका वृद्ध व्यक्तीचा व्हिडीओ समोर आला आहे. हे आजोबा म्हणत आहेत की, महिलांना घराबाहेर पडण्याचा अधिकार देणं ही खूप मोठी चूक झाली आहे. महिलांनी मर्यादेत राहिलं पाहिजे. हा व्हिडीओ पाहून आता तुम्हीच सांगा यामध्ये नेमकी चूक कुणाची आहे.

बसमध्ये गर्दी आहे आणि या गर्दीवरून वृद्ध प्रवासी आणि पाठीमागे उभी असलेली तरुणी यांच्यात वाद झाला. हा वाद सुरू असताना आजोबांनी महिलांबाबत जी काही वक्तव्य केली, ती तरुणीनं आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे आजोबा म्हणत आहेत की, महिलांनी घरात राहिलं पाहिजे. बाहेर जाण्याचा अधिकार पुरुषांचा आहे. यावर तरुणी विचारते, असं का? महिलांनी फक्त घरातच का राहिलं पाहिजे? यावर आजोबा उत्तर देतात, कारण ती महिला आहे. महिलांची इभ्रत असते, त्यामुळे त्यांनी मर्यादेत राहिलं पाहिजे.या उत्तरामुळे वाद आणखी वाढतो. तरुणी विचारते, महिला घरात तरी कुठे सुरक्षित आहेत? घरातसुद्धा त्यांचं शोषण केलं जातं. या प्रश्नामुळे आजोबा आणखी संतापले आणि म्हणाले, सगळ्या महिला घराबाहेर पडल्या त्यामुळे बसची बघा काय अवस्था झाली आहे. दरम्यान, तरुणी म्हणते की, गर्दीसाठी प्रशासन जबाबदार आहे. पण आजोबा तिला मध्येच थांबवत म्हणाले, प्रशासन वगैरे काही नाही, महिलांचीच चूक आहे. या वादाचा शेवट आजोबांनीच केला. ते म्हणाले, ‘मी ब्रह्मांडाचा बाप आहे.’

पाहा व्हिडीओ

चूल आणि मूल सांभाळणारी स्त्री आज जागतिक पातळीवर आपल्या कर्तृत्व सिद्ध करत असल्याची उदाहरण आपण देत असलो, तरी दुसऱ्या बाजूला देशात महिलांवर होणारे अत्याचार, त्यांचं वाढतं अनारोग्य आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी दुय्यम वागणूक हे वास्तव नक्कीच एक समाज म्हणून विचार करायला भाग पाडणारं आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात खांद्याला खांदा लावून वावरणारी भारतीय स्त्री आजही स्त्री पुरुष समानतेत पिछाडीवरच दिसते.