Snakes In Water Tank Video : कल्पना करा की, तुम्ही सकाळी उठून अंघोळीसाठी किंवा तोंड धुण्यासाठी नळ उघडता आणि पाणीच आलं नाही म्हणून तुम्ही टाकी उघडून बघितल्यावर समोर अनेक साप दिसले तर? अंगावर काटा आणणारी अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. एका कुटुंबाच्या पाण्याच्या टाकीत सापाची एक-दोन नव्हे, तर तब्बल २७ जिवंत पिल्ले सळसळताना आढळली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

नेमकं काय घडलं?

उत्तराखंडमधील हरिद्वारमधील एका घरात काही दिवसांपासून पाण्याच्या टाकीतून पाणीच येत नव्हते. त्यामुळे जेव्हा कुटुंबाने टाकीचे झाकण उघडून आत पाहिले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण- टाकीच्या तळाशी आणि कडांवर एक दोन नव्हे तर २७ साप रेंगाळत होते. एकामागून एक तब्बल २७ सापांची पिल्ले तिथे एकत्र घर करून राहिली होती.

हा थरार पाहून संपूर्ण कुटुंब प्रचंड भयभीत झाले. त्यांनी तत्काळ वेळ न घालवता, वन विभागाला (Forest Department) याची माहिती दिली. वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत अत्यंत कौशल्याने सर्वच्या सर्व २७ सापांना सुखरूप बाहेर काढले आणि जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडले.

टाकीत एवढ्या मोठ्या संख्येने साप पाहून ‘पाण्यात विष तर विरघळले नसेल ना?’ अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, तज्ज्ञांच्या मते काळजीचे कारण नाही. कारण- हे साप ‘चेकर्ड कीलबॅक’ (Checkered Keelback) प्रजातीचे होते, जे पूर्णपणे बिनविषारी असतात. त्यांचे मुख्य अन्न मासे आणि बेडूक आहे. जरी या सापाने माणसाला चावा घेतला तरी मृत्यूचा धोका नसतो. मात्र, तीव्र वेदना, सूज किंवा किरकोळ जखम होऊ शकते.

आरोग्याला धोका : हे साप विषारी नसले तरी पाण्याच्या टाकीत ते एवढ्या संख्येने असल्यामुळे पाण्यात जंतुसंसर्ग (Infection) होण्याचा आणि आजार पसरण्याचा मोठा धोका होता. आता ही टाकी पूर्णपणे रिकामी करून, निर्जंतुकीकरण (Sanitize) केल्यानंतरच वापरता येणार आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

@Rajtyag04068412 नावाच्या एक्स (X) युजरने या घटनेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने या घटनेची माहिती दिली आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

या व्हिडीओवर कमेंट्सचा पूर आला आहे. अनेक युजर्सनी म्हटले आहे, “हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मी पळत जाऊन आधी माझ्या घराची पाण्याची टाकी तपासावी, असे मला वाटत आहे.” तर काहींनी वन विभागाच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. या घटनेने सर्वांनाच एक मोठा धडा दिला आहे की, घराची पाण्याची टाकी नियमितपणे स्वच्छ करणे किती गरजेचे आहे.