उत्तर प्रदेशातील गाझियाबाद शहरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. रोजच्या जेवणात विश्वासाने खाल्ल्या जाणाऱ्या अन्नाशी खेळ केल्याचा आरोप एका रेस्टॉरंट कर्मचाऱ्यावर झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती आणि रागाचं वातावरण निर्माण झाले आहे. अन्नसुरक्षा, स्वच्छता आणि जबाबदारी यावर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
हा व्हायरल व्हिडीओ गाझियाबादमधील ‘चिकन पॉईंट’ नावाच्या एका रेस्टॉरंटमधील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओमध्ये एक कर्मचारी तंदूरजवळ उभा राहून चपात्या बनवत आहे. पण, या नेहमीच्या दृश्यात एक अत्यंत घाणेरडा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडीओत दिसतं की, कर्मचारी चपात्या बनवत आहे आणि तंदूरला लावण्याआधी त्यावर थुंकताना दिसत आहे.
हा सगळा प्रकार तिथेच असलेल्या कुणीतरी लपून कॅमेऱ्यात शूट केला आणि नंतर सोशल मीडियावर टाकला. काही तासांतच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. लोकांनी हा व्हिडीओ पाहताच संताप व्यक्त केला आणि तात्काळ कारवाईची मागणी केली. हा व्हिडीओ पोलिसांच्याही नजरेत आलेला आहे. माधुबन बापूधाम पोलिस ठाण्यात ही घटना घडल्याचं स्पष्ट झालं.
पाहा व्हिडीओ
व्हिडीओची पहिले तर चौकशी केल्यानंतर आरोप खरे असल्याचं पोलिसांनी सांगितलं. कविनगरचे एसीपी सूर्यबली मौर्य यांनी माहिती देताना सांगितलं की, आरोपी कर्मचारी जावेद अन्सारी याला तात्काळ अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
व्हिडीओखालील प्रतिक्रियांमध्ये लोकांचा प्रचंड संताप दिसून आला आहे. एकाने म्हटले आहे, “असं अन्न खाऊन लोक आजारी पडतात, जबाबदार कोण?” तर दुसऱ्याने म्हटले, “अशा लोकांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” तर तिसऱ्याने म्हटले, “आता बाहेरचं खाणंच बंद करावं लागेल.” अनेकांनी प्रशासनावरही टीका करत, नियमित तपासणी का होत नाही असा प्रश्न केला.स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे कठोर कारवाई, तपासणी आणि रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांवर कडक नजर ठेवण्याची मागणी केली आहे. अन्न म्हणजे विश्वास, आणि त्या विश्वासाशी खेळणाऱ्यांना माफी नाही, अशी भावना दिसून येते.
