Shocking viral video: अलीकडच्या काळात ग्रामीण आणि उपनगरीय भागांत बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. हे वन्य प्राणी अचानक सर्वत्र, निवासी भागात, रस्त्यांवर, शेती असलेल्या भागांत दिसू लागले आहेत. बिबट्याचे माणसे, पाळीव प्राणी आणि भटकी जनावरे यांच्यावरील हल्ले होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांचे रक्षण करतात; परंतु रस्त्यावर भटकणाऱ्या गाई आणि वासरांचे या हल्ल्यांपासून कोणीही रक्षण करू शकत नाही. अशाच एका हल्ल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, त्याने सर्वांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर swapnilkhatal नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. पोस्ट होताच, काही तासांतच या व्हिडीओला लाखो व्ह्युज मिळाले. तब्बल १० लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला असून, जवळपास १५ हजार लोकांनी त्याला लाइक केले आहे. ग्रामीण रस्त्यावर बसलेल्या एका गाईवर बिबट्याने केलेल्या हल्ल्याचा हा व्हिडीओ आहे.

व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका गाईवर एक बिबट्या हल्ला करताना दिसतो. क्षणात तो गाईची मान जबड्यात घट्ट पकडतो. जीव वाचवण्यासाठी गाय तडफडत राहते, ती स्वतःला सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करीत राहते; परंतु बिबट्याचा पंजा आणि जबडा इतका मजबूत असतो की, ती सुटूच शकत नाही.

काही क्षणांसाठी बिबट्या गाईची मान सोडतो; ती उठून पळून जाण्याच्या आधीच तो पुन्हा तिच्यावर तुटून पडतो. परिस्थिती इतकी भयानक दिसते की, व्हिडिओ शूट करणारे लोकही क्षणभर हादरतात. गाईला स्वतःचा जीव वाचवता न येणारा हा संपूर्ण प्रसंग अत्यंत धक्कादायक आहे.

पाहा व्हिडिओ

या व्हिडीओला नेटिझन्सकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी हा व्हिडीओ AI जनरेटेड असल्याचा दावा केला असून, त्यात वास्तवतेचा अभाव असल्याचे म्हटले आहे. तर, अनेकांना तो खऱ्या घटनेचा व्हिडीओ असल्याचे वाटत आहे. कारण- रस्त्यावरून जाणारी वाहने, लोकांचे आवाज, तसेच संपूर्ण परिस्थिती नैसर्गिक वाटते.

एका युजरने व्हिडीओ शूट करणाऱ्याला फटकारत लिहिले—“तुम्ही काय गाय मेल्यावरच व्हिडीओ बंद करणार होता का?” तर दुसऱ्याने नैसर्गिकतेकडे निर्देश करीत म्हटले—“हीच निसर्गाची साखळी आहे… जे नियतीत आहे, ते होतंच. तुम्ही मदत करू शकला असता, तर उत्तम झालं असतं.”