Bear Attack Shocking Video : सोशल मीडियावर वन्यजीवांशी संबंधित एकापेक्षा एक अंगावर काटा आणणारे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असतात. परंतु, सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हाला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. जंगलात अस्वलांच्या टोळीने वेढलेल्या एका व्यक्तीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी झाडाचा आसरा घेतला आणि तो थेट झाडावर चढला. मात्र, जेव्हा अस्वलांनीही त्याचा पाठलाग करत झाडावर चढण्यास सुरुवात केली, तेव्हा त्या व्यक्तीची अक्षरशः पाचावर धारण बसली. एक अस्वल तर अगदी त्याच्या पायाजवळ पोहोचून त्याच्या बुटाचा वास घेऊ लागले. आयुष्य आणि मृत्यूच्या कात्रीत अडकलेल्या या व्यक्तीचा हा थरारक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
जीव वाचवण्यासाठी झाडावर चढला तरुण
व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता, घनदाट जंगलात अस्वलांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी एक व्यक्ती वेगाने एका मोठ्या झाडावर चढून बसते. खाली अस्वलांची टोळी उभी होती. झाडावर उंच जागी गेलो तर आपण सुरक्षित राहू, असा त्या व्यक्तीचा समज होता. परंतु, अस्वलांनी माघार घेतली नाही. त्यांनी झाडावर चढण्याचा प्रयत्न सुरू केला आणि ते त्या व्यक्तीच्या अगदी जवळ पोहोचू लागले. हा व्हिडिओ जो कोणी पाहिल, त्याच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.
बुटापर्यंत पोहोचले हिंस्त्र अस्वल
अंगावर काटा आणणारा क्षण तेव्हा समोर आला, जेव्हा अस्वल झाडाच्या खोडाला पकडून वर चढू लागले. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, अस्वल त्या व्यक्तीच्या अत्यंत जवळ पोहोचते आणि त्याच्या पायातील बुटाचा वास घेऊन त्याला स्पर्श करू लागते. ती व्यक्ती जराही हालचाल न करता, श्वास रोखून झाडाची फांदी घट्ट पकडून राहते. थोडीशीही निष्काळजीपणा त्याच्या जीवावर बेतू शकला असता.
अस्वल खरोखरच झाडावर चढू शकतात का?
अस्वल अत्यंत सहजतेने आणि वेगाने झाडावर चढू शकतात. झाडावर चढून अस्वलाच्या हल्ल्यापासून वाचता येते, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. अस्वलांचे नखे अत्यंत मजबूत, लांब असतात, जे झाडाच्या खोडात आणि पालापाचोळ्यात घट्ट रुततात. यामुळे त्यांना वर चढण्यासाठी उत्तम पकड मिळते.
विशेषतः ‘काळे अस्वल’ (Black Bear) झाडावर चढण्यात अत्यंत पटाईत असतात आणि एखाद्या मांजराप्रमाणे अवघ्या काही सेकंदात उंच झाडावर पोहोचतात. त्यामुळे जंगलात अस्वलाचा सामना झाल्यास झाडावर चढणे हा सुरक्षित उपाय मुळीच मानला जात नाही.
