Lift Shocking Video Viral : सध्या सोशल मीडियावर लिफ्टमधील एकापेक्षा एक वाईट घटनांचे सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. यातील काही व्हिडिओंमधून लोकांचा निष्काळजीपणा उघड होतो, तर काही व्हिडिओंमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर येतात. अलीकडेच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लिफ्टमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका लहान मुलाबरोबर एक तरुण गैरवर्तन करताना दिसत आहे. ही संपूर्ण घटना लिफ्टमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मुलाला लिफ्टमध्ये येण्यापासून रोखले
व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण लिफ्टच्या आत उभा असलेला दिसतोय. तेवढ्यात पाठीवर बॅग घेतलेला एक लहान मुलगा लिफ्टच्या दिशेने येतो आणि आत शिरण्याचा प्रयत्न करतो. मात्र, मुलगा लिफ्टमध्ये शिरत असतानाच आधीच लिफ्टमध्ये असलेला एक तरुण त्याला हाताने बाहेर ढकलतो. पण तरीही तो मुलगा जिद्दीने पुन्हा आत जाण्याचा प्रयत्न करतो, पण तो तरुण त्याला पुन्हा एकदा बाहेर ढकलून देतो.
सुरुवातीला गंंमत वाटली, पण नंतर…
व्हिडिओच्या सुरुवातीला हे दोघे जण एकमेकांशी गमतीत असे वागतायत असे वाटत होते, मात्र, काही सेकंदांतच या घटनेला गंभीर वळण लागते. ते लहान मुलगा जेव्हा तिसऱ्यांदा लिफ्टमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा तो तरुण त्याला अचानक अतिशय जोरात बाहेर ढकलतो. या जोरदार धक्क्यामुळे तो लहान मुलगा लिफ्टच्या बाहेर थेट जमिनीवर कोसळतो. मुलगा खाली पडताच तो तरुण त्याला तिथेच सोडून लिफ्टचा दरवाजा बंद करतो आणि एकटाच वर निघून जातो. हा व्हिडिओ इथेच संपतो.
सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप अनावर
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी या तरुणाच्या कृत्यावर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. लहान मुलाबरोबर असे अमानुष वर्तन करणे पूर्णपणे अयोग्य आणि अस्वीकार्य आहे, अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.
काहींनी चिंता व्यक्त करत लिहिले की, “अशा प्रकारे जोरात ढकलल्यामुळे मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊ शकली असती.” तर अनेकांनी या नराधम तरुणावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशा घटनांमुळे लहान मुलांच्या मनावर कायमस्वरूपी भीती निर्माण होऊ शकते, अशी भीतीही काही युजर्सनी व्यक्त केली. “हा माणूस आहे की प्राणी?” असा सवाल करत, “जर ही घटना आमच्यासमोर घडली असती, तर आम्ही त्या मुलाला तात्काळ मदत करून संबंधित व्यक्तीला चांगलाच धडा शिकवला असता,” अशा भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत
