Shopkeeper Spitting On Pizza Video Viral : सोशल मीडियावर सध्या एक अत्यंत किळसवाणा आणि संतापजनक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून कोणाचेही रक्त खवळल्याशिवाय राहणार नाही. ज्या हॉटेल किंवा दुकानातून आपण विश्वासाने खाद्यपदार्थ विकत घेतो, तिथेच ग्राहकांच्या आरोग्याशी कशा प्रकारे जीवघेणा खेळ खेळला जातो याचा पुरावा या घटनेतून समोर आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, आता ती वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक दुकानदार पिझ्झा तयार करताना दिसत आहे. मात्र, पिझ्झा ग्राहकाला देण्यापूर्वी तो त्यावर मुद्दाम थुंकताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अत्यंत घाणेरड्या मानसिकतेचे दर्शन घडवणारा हा प्रकार पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून, अशा विकृत दुकानदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नोएडाच्या सेक्टर २४ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौरा गावाजवळ असलेल्या पिझ्झा हंट या नावाच्या दुकानात ही धक्कादायक घटना घडली. त्यात दुकानदार पिझ्झा तयार करताना त्यावर थुंकत होता. या आरोपी दुकानदाराचे नाव मुजम्मिल असल्याचे सांगितले जात आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच गदारोळ निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करून आरोपीला अटक केली. मात्र, सोशल मीडिया वापरकर्तेही या कृत्यामुळे संतप्त झाले असून, या घटनेवर टीका करीत आहेत.
