एखाद्या महिलेला जर मासिक पाळी आली तर त्या दरम्यान मुलींनी किंवा महिलांनी पूजा-पाठ करु नये. तसंच मंदिरात जाऊ नये असं सांगितलं जातं. मासिक पाळी असताना अमुक करु नये तमुक करु नये असं सगळं सांगितलं जातं. आता कथा वाचक जया किशोरी यांनी याबाबत भाष्य केलं आहे. जया किशोरी यांचा एक व्हिडीओ आहे. ज्यामध्ये त्यांनी हे विधान केलं आहे ते आता व्हायरल झालं आहे. द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग आठवा, तिला जेव्हा भरसभेत आणलं गेलं तेव्हा ती रजःस्वला होती. तिने देवाचा धावा केला, देवाने तिची मदत केली असं महाभारताचं उदाहरणही आपल्या वक्तव्यात दिलं आहे.

काय म्हटलंय जया किशोरी यांनी?

जया किशोरी यांना विचारणा करण्यात आली की स्त्रियांना मासिक पाळी आल्यानंतर आजही हे सांगितलं जातं की पूजा करु नका, मंदिरात जाऊ नका, लोणच्याला हात लावू नका, तुळशीला पाणी घालू नका आणि हे फक्त हिंदू धर्मातच नाही जवळपास सगळ्यात धर्मांत सांगितलं जातं. अशावेळी तुम्ही काय करता? असं विचारल्यावर जया किशोरी म्हणाल्या, “मागच्या काही काळात काही नियम तयार केले गेले, त्यांची कारणं वेगळी होती. वैज्ञानिक दृष्टीने या गोष्टींकडे पाहिलं तर जेव्हा स्त्रियांची मासिक पाळी सुरु असते तेव्हा त्यांनी आंबट पदार्थ खाऊ नये, त्या कालावाधीत त्यांच्या प्रकृतीसाठी ते चांगलं नसतं. तसंच त्या काळात घरातून बाहेर पडू नका सांगितलं जात होतं कारण अनेक घरांमध्ये महिलांना कापडाचा वापर करावा लागत होता. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. पिरियड्स आल्यानंतर काय करता येईल त्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. काही लोकांनी या गोष्टी थेट अस्पृश्यतेशी जोडल्या आहेत जी बाब चुकीची आहे. एखाद्या मुलीला २० व्या वर्षानंतर किंवा त्यानंतर सांगितलं की लोणचं खाऊ नकोस तर ती ऐकेल. पहिल्यांदा जेव्हा पाळी येते तेव्हा तर ती लहानच असते. अशा वेळी तिने ऐकावं म्हणून हे सांगितलं गेलं की तू लोणच्याला हात लावला तर सगळं लोणचं खराब होईल. पण नंतर नंतर त्याच्याशी धर्म जोडला गेला.”

Jaya Kishori Statement on Menstruation
जया किशोरी यांनी नेमकं काय वक्तव्य केलं आहे? (फोटो-जया किशोरी, फेसबुक पेज)

अस्पृश्यता जोडली गेली आणि नियम लादले गेले

जया किशोरी पुढे म्हणाल्या की पूर्वीची जर गृहव्यवस्था पाहिली तर सगळी कामं महिलाच करत होत्या. त्यांना काहीतरी आराम मिळाला पाहिजे यासाठी मासिक पाळीचे तीन ते चार दिवस त्यांना काहीही काम करु दिलं जात नसे. पूर्वी लोकांच्या वस्तीपासून जंगल जवळ असायचं. मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियांच्या शरीरातून रक्तस्त्राव होत असतो. त्याचा वास जंगलातील जनावरांना आला तर ते प्राणीही त्यांच्यावर हल्ला करु शकतील या उद्देशानेही त्यांना एका बंदीस्त खोलीत ठेवलं जायचं, अशी बरीच कारणं होती, शिवाय त्या काळात पॅड्स किंवा इतर साधनांचा शोध लागला नव्हता. त्या काळात स्त्रियांना पोटात असह्य दुखत असतं. पण जाहिरात काय केली जाते की पॅड लावलं की तुम्ही डोंगरही चढू शकता. पण तो कालावधीच तसा नसता. महिलांनी आराम करणं गरजेचं होतं. त्याच्याशी अस्पृश्यता उगाच जोडली गेली असं मला वाटतं असं जया किशोरी म्हणाल्या. आज तकने हे वृत्त दिलं आहे.

मासिक पाळी असताना स्त्रियांनी मंदिरात जावं का?

मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की स्त्रियांनी त्या अपवित्र आहेत हे समजून मंदिरात न जाण्याचा पर्याय अजिबात घेऊ नये. कारण देवासाठी कुणीही अपवित्र नाही. आपण महाभारताचं उदाहरण पाहू. द्रौपदीचं वस्त्रहरणाच्या वेळी ती रजःस्वला होती. तिने देवाचा धावा केला आणि देवाने तिचं रक्षण केलं. जर ती अपवित्र आहे असं देवाला वाटलं असतं तर तो तिच्या मदतीला का धावला असता? कुठल्याही स्थितीत देवाला तुम्ही पुकारा तो तुम्हाला प्रतिसाद देतोच. देवाचं नाव घेता तेव्हा तुमची उर्जा ही खालून वरच्या दिशेला जात असते. त्यामुळे त्या काळात महिलांनी मंदिरात जाऊ नये कारण त्यांची उर्जा खालच्या बाजूने वरच्या दिशेला जाता कामा नये. ती उर्जा जिथे असते तिथेच असली पाहिजे.देवाच्या नावाने फक्त नियम घालून दिलेत पण ते माणसाने घालून दिलेत. तुम्हाला कधीही संशय असेल तर वाचा. देवाने कधीही कुठल्या स्त्रीबाबत असं काही सांगितलेलं नाही. आपल्याला पटलाय तो अर्थ लोकांनी काढला आहे. देव चुकीचा नसतो, त्याचं अर्थबोधन करणारा माणूस चुकीचा आहे. त्यांच्यासाठी कुठलाही भेदाभेद नाही. स्त्री, पुरुष, जनावरं कशातही देव फरक करत नाही. निसर्ग सगळ्यांसाठी जसा एक आहे तसंच देवाचं स्वरुप आहे असंही जया किशोरी यांनी म्हटलं आहे. माझा देव भेदभाव करत नाही असं जया किशोरी यांनी म्हटलं आहे.

जया किशोरी कोण आहेत?

जया किशोरी यांचा जन्म १३ जुलै १९९५ साली एका आध्यात्मिक कुटुंबात झाला. जया किशोरी यांचे कुटुंब मुळचे राजस्थानचे आहे. पण, सध्या त्यांचे संपूर्ण कुटुंब कोलकाता येथे राहते. जया किशोरी सात वर्षांच्या असताना त्यांचा अध्यात्मिक जगाकडे कल वाढला. जया किशोरी यांच्यावर आजोबांचा खूप प्रभाव होता. ते त्यांना श्रीकृष्णाच्या कथा सांगायचे. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांनी लिंगाष्टकम, शिव तांडव स्तोत्र, रामाष्टकम् यांसारखी संस्कृतमधील सर्व स्तोत्र तोंडपाठ केली होती. जया किशोरी यांचे गुरू गोविंद राम मिश्रा यांनी त्यांना ‘किशोरी जी’ ही पदवी दिली.

जया किशोरी एका कथेसाठी १० लाख रुपये घेतात

जया किशोरी कथाकथन करण्यासाठी लाखो रुपयांची फी घेतात. एका रिपोर्टनुसार, त्या एका कथेसाठी १० लाख रुपये फी घेतात. जया किशोरी यांचा सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग असतो. फीमधील अर्धा हिस्सा त्या समाजकार्यासाठी दान करतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांच्या शिक्षणाचा खर्च त्या उचलतात. जया किशोरी यांची वक्तव्यं, त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर त्यांचा प्रभाव आहे. त्यांचे फॉलोअर्सही मोठ्या प्रमाणावर आहेत.