Siddhivinayk Temple video 1st jan: नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं करण्याची परंपरा अनेक भाविकांमध्ये रुजलेली आहे. यामुळे दरवर्षी १ जानेवारीला पहाटेपासूनच मुंबईतील प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. यात श्री सिद्धिविनायक, महालक्ष्मी, मुंबादेवी आणि बाबूलनाथ मंदिरांचा विशेष समावेश असतो. या मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी लाखोंच्या घरात पोहोचते. विशेषतः श्री सिद्धिविनायक मंदिरात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लाखो भाविकांची गर्दी उसळली आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यावेळी या ठिकाणची रांग जर तुम्ही पाहिली तर तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल एवढं नक्की.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सिद्धिविनायक मंदिरापासून सुरु झालेली ही रांग अक्षरश: आता दादर प्रभादेवी या स्टेशन परिसरापर्यंत आलेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविक मुंबईत दाखल झाले आहेत मुंबईकरांनी याठिकाणी बाप्पााच्या दर्शनासाठी रांग लावलेली आहे. लालागच्या राजाच्या दर्शनासाठी ज्याप्रकारे भाविक गर्दी करतात अगदी त्याचप्रमाणे याठिकाणी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.

मंदिर प्रशासनांकडून चोख व्यवस्था : नववर्षाच्या पूर्वसंध्येला ३१ डिसेंबर आणि पहिल्या दिवशी १ जानेवारीला मंदिरांमध्ये होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मुंबईतील जवळपास सर्वच मंदिर प्रशासनांकडून योग्यपद्धतीनं पूर्व नियोजन करण्यात आलं आहे. मुंबईतील प्रत्येक मंदिरांमध्ये वर्षाच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर गर्दी होणं स्वाभाविक आहे. मात्र, सध्या निवणुकांच्या काळात ही गर्दी दरवर्षीपेक्षा जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वैद्यकीय सुविधा, रांगेत पिण्याचं पाणी, मोबाईल टॉयलेट्स, मंडप अश्या अनेक सुविधाही प्रमुख मंदिरांकडून पुरवण्यात आल्या आहेत.

पाहा व्हिडीओ

विविध रांगांचं नियोजन: गाभाऱ्यातून सर्वसामान्यांसाठी दर्शनाची रांग, महिलांसाठी स्वतंत्र विशेष रांग, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिलांना आणि नवजात बालकांसह येणाऱ्या भाविकांसाठी खास रांग, मुखदर्शन रांग अशा खास रांगाचं नियोजन करण्यात आलं आहे. मंदिराजवळील राजे शहाजी मैदानात मोठा प्रशस्त तंबू उभारण्यात आला आहे, ज्यात एकावेळी सुमारे १० हजार भाविक थांबू शकतील. मंदिर पहाटे ३.१५ वाजल्यापासून उघडलं असून रात्री ११:३० पर्यंत सुरू राहील. भाविक मेट्रोनं थेट सिद्धिविनायक मंदिरापर्यंत येऊ शकतात. तसेच, दादर रेल्वे स्टेशन ते मंदिरापर्यंत न्यासाकडून मोफत एसी बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय, ६ जानेवारी २०२६ रोजी येणाऱ्या वर्षातील पहिल्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानंही भाविकांसाठी विशेष सेवा-सुविधांचं नियोजन करण्यात येत आहे.