Groom stranded at airport amid IndiGo crisis : IndiGoच्या उड्डाण रद्दप्रकरणामुळे हजारो प्रवासी अडकल्याची परिस्थिती अजूनही सुटलेली नाही. या गोंधळाचा सर्वाधिक फटका बसला तो लग्नघरातील लोकांना बसला आहे कोणाचे पाहूणे अडकले तर कोणाला लग्नाचे विधी पुढे ढकलले, तर कुणाला स्वतःच्या लग्न-समारंभाला व्हिडिओ कॉलवरून ‘हजेरी’ लावावी लागली. एका कुटुंबाने तर ऐनवेळी चार्टर विमान बुक करण्याची वेळ आली.

“हे माझंच लग्न आहे… आणि मीच पोहोचू शकत नाही” (Groom shows invitation, says he is missing his own wedding)

या सर्वात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलेल्या व्हिडिओमध्ये एक युवक हातात स्वतःचं लग्नपत्रिकेचं कार्ड उंचावत इतर प्रवाशांना परिस्थिती सांगताना दिसतो. चेहऱ्यावर हसरा भाव, पण मनातली असहाय्यता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तो म्हणतो, “माझंच लग्न आहे, आणि मीच जाऊ शकत नाही. काय करू मी, यार?”

Instagram आणि X (Twitter) वर हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला. @NewsAlgebraIND या हँडलवरून शेअर करताना लिहिलं — “त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागे दुख लपवले आहे.” या एका वाक्यात त्या तरुणाची अवस्था व्यक्त झाली.

सोशल मीडियावर सहानुभूतीचा पूर (Social media reactions pour in)

व्हिडिओ पाहून असंख्य नेटिझन्सनी संताप आणि सहानुभूती व्यक्त केली. एकाने लिहिले, “हे जर युरोप-अमेरिकेत घडलं असतं तर एअरलाइन्सला कोट्यवधींचा दंड झाला असता. इथे मात्र काहीही झालं तरी कंपन्यांना मोकाट वाव.” दुसरा म्हणाला, “भारतामध्ये प्रवाशांना नेहमीच गृहित धरलं जातं. नफा कमावणाऱ्या कंपन्या कधीच जबाबदारी घेत नाहीत.”

तर काही जणांनी या नवरदेवासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या—“देव करो, तू लवकर पोहोचो, त्याचं लग्न सुरळीत पार पडो, आणि बाकीच्यांनाही सुरक्षितरित्या घरी जाता येवो.”

सरकारची कडक भूमिका; भाड्यांवर नियंत्रण (Government orders strict fare caps amid chaos)

IndiGo उड्डाण रद्दप्रकरण दिवसेंदिवस चिघळत असल्याने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (MoCA) शनिवारी महत्त्वाचा आदेश जारी केला. सर्व एअरलाइन्सनी भाड्यांच्या मर्यादांचे काटेकोर पालन करावे, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली.

मंत्रालयाने म्हटले, “परिस्थिती पूर्णपणे स्थिर होईपर्यंत हे भाडे-कॅप्स लागू राहतील. प्रवाशांची अडचण पाहून त्यांचा गैरफायदा होऊ नये, विशेषतः वृद्ध, विद्यार्थी, रुग्ण अशा तातडीने प्रवास करायला हवे असलेल्या नागरिकांना आर्थिक फटका बसू नये, यासाठी हा निर्णय घेतला आहे.”

मात्र, या आदेशानंतरही अनेक प्रवासी तिकीटदर पाहूनच चक्रावले. अचानक वाढलेल्या मागणीमुळे ऑनलाईन भाडे झपाट्याने वर गेले, आणि लोकांनी याबाबत सोशल मीडियावर संताप व्यक्त केला.

गोंधळ शमण्याची चिन्हे नाहीत; प्रवाशांची प्रतीक्षा कायम(Chaos continues, passengers await normalcy)

IndiGoच्या या अभूतपूर्व उड्डाण रद्दसंकटामुळे देशभरातील विमानतळांवर शेकडो प्रवासी तासन तास अडकले आहेत. काहीजणांचे महत्त्वाचे कार्यक्रम बिघडले, तर काहींना अतिरिक्‍त खर्च करावा लागला. लग्नाच्या मांडवात पोहोचू न शकलेल्या त्या नवरदेवाचा व्हिडिओ या संकटाचं सर्वात भावनिक प्रतीक बनला आहे. परिस्थिती सामान्य कधी होणार, हे अद्याप स्पष्ट नाही; पण प्रवासी मात्र एका आशेवर उभे आहेत — की त्यांच्या प्रवासाचा मार्ग लवकरच सुकर होईल.