कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी नागपूरचे आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दोन महिने होण्याच्या आतच अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये अगदी गँगस्टर संतोष आंबेकरच्या बंगल्यावरील कारवाई असो किंवा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या हजेरीमध्ये झालेली सुधारणा असो, मुंढेंनी कार्यभार हाती घेतल्यानंतर कामांचा सपाटा लावला आहे. मात्र सध्या मुंढे चर्चेत आहेत ते त्यांच्या एका फोटोमुळे.
नियमबाह्य, अनधिकृत बांधकामांना अजिबात थारा न देणाऱ्या मुंढे हे सार्वजनिक जिवनामध्ये क्वचितच हसताना दिसतात. धडाडीचे निर्णय आणि शिस्तप्रिय स्वभावामुळे त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांना त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त भिती असते. त्यामुळे त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याचे आणि हलक्यापुलक्या स्वभावाचे दर्शन तसे दुर्मिळच असते. मात्र काही दिवसांपूर्वी मुंढे यांनी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची मुंबईतील कार्यालयामध्ये भेट घेतली. यावेळी काही विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. मात्र या भेटीचा एक फोटो जलसंपदामंत्र्यांनीच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केला आहे.
नक्की वाचा >> तुकाराम मुंढेंचा दणका! नागपूरमधील डॉनचा बंगला केला जमीनदोस्त
सामान्यपणे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेते मंडळींबरोबर फोटो काढण्यासाठी चढाओढ सुरु असल्याचे चित्र दिसते. मात्र मुंढे यांच्या भेटीनंतर या भेटीतील एका हलक्यापुलका क्षण कॅमेरामध्ये टीपला गेला अन् तोच शेअर करण्याचा मोह जयंत पाटील यांना आवरला नाही. त्यांनी ट्विटवरुन मुंढेंबरोबरचा हसणारा फोटो शेअर करत, ‘नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज विधानभवनातील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली,’ अशी कॅप्शन या फोटोला दिली.
नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज विधानभवनातील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. @Tukaram_IndIAS pic.twitter.com/g0SmZBrTp0
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) March 4, 2020
जयंत पाटील यांनी शेअर केलेला हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. चार हजारहून अधिक जणांनी लाईक केला आहे. अनेकांनी कमेंट करुन नक्की काय झाल्यामुळे मुंढे इतक्या मोकळ्यापणे हसले असतील याबद्दल कमेंट करुन अंदाज व्यक्त केला आहे. “मुंढे साहेबांकडे शिक्षण विभाग द्यायला हवा होता”, “अधिकारी न मंत्री भेट न मुंढे साहेबांच दिलखुलास हास्य याच अर्थ प्रशासन हे सुशासन होत आहे. असंच योगदान नव्या महाराष्ट्रासाठी द्या”, “हा फोटो पाहून मला यशवंतरावजी चव्हाण न राम प्रधान साहेब यांची आठवण झाली”, “संयम आणि आक्रमक अशा टोकाच्या स्वभावाची आहेत दोघे. सोबत हास्यकारंजे! सुशासनीय दृश्य”, “अधिकारी असावा तर असा”, “खुपच छान! पण असे अनेक तुकाराम मुंडे प्रत्येक जिल्ह्यात पाठवा”, अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी या ट्विटवर केल्या आहेत.
नक्की वाचा >> शत प्रतिशत… मुंढेंच्या धास्तीने महापालिका कर्मचाऱ्यांच्या हजेरीत सुधारणा
स्वत: तुकाराम मुंढेंनी या फोटो आपल्या ट्विटवरुन कोट करत रिट्विट केला आहे. “जयंत पाटील यांच्याबरोबरच्या भेटीमध्ये खूप चांगली आणि सकारात्मक चर्चा झाली,” असं मुंढेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Had pleasant and constructive interaction with Hon @Jayant_R_Patil . https://t.co/pJm6BZkJhf
— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) March 4, 2020
मात्र नक्की कोणत्या गोष्टीवर हे नेते आणि अधिकारी इतक्या मोकळ्यापणे हसले यामागील खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही.