International Women’s Day : ‘बार्बी गर्ल’ म्हटलं की डोळ्यासमोर लगेच गुलाबी रंगाचे आकर्षक कपडे घातलेली, मॉडेलसारखी देखणी बाहुली उभी राहते. लहान मुलींपासून तरुणींंपर्यंत अनेकांना बार्बीचे वेड आहे. अनेक मुली तिच्यासारखं फॅन्सी, स्वप्नवत जग जगण्याची कल्पना करतात. पण बार्बीची ओळख केवळ खेळण्यापुरती मर्यादित नव्हती; ती समाजातील महिलांच्या प्रतिमेचंही प्रतीक बनली होती. फॅशन, मेकअप आणि चमकदार जीवनशैलीपुरतीच तिची चौकट आखली गेली होती — जणू काही आकर्षक सोन्याच्या पिंजऱ्यात कैद झालेली प्रतिमा.

मात्र काळ बदलला आहे. आजच्या युगात महिला प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. त्याच बदलाचा प्रतिबिंब आता बार्बीमध्येही दिसत आहे. म्हणूनच बार्बी फक्त फॅन्सी मॉडेलच्या रुपात नव्हे तर खेळाडू, गायिका, उद्योजिका, अंतराळवीर, रेस कार चालक, गिर्यारोहक, सर्फर अशा विविध रुपांमध्ये दिसणार आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त खास सन्मान (International Women’s Day Recognition)

विविध क्षेत्रांत अडथळे पार करत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी ही संकल्पना राबवण्यात आल्याचे प्रसिद्ध खेळणी निर्माता कंपनी मॅटेलकडून सांगण्यात आले. जगभरातील आठ प्रेरणादायी महिलांचा समावेश या टीममध्ये करण्यातआला आहे. भारतासाठी आनंदाची बातमी अशी की, या ‘ड्रीम टीम’मध्ये झळकणारी भारताची क्रिकेटपटू स्मृती मानधनाचा समावेश करण्यात आला आहे.८ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनापूर्वी ही घोषणा करण्यात आली.

बार्बीच्या अधिकृत सोशल मीडियावरून घोषणा (Social Media Announcement)

बार्बीच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून या उपक्रमाची माहिती देताना “स्वप्न आता खऱ्या अर्थाने साकार झालं आहे आणि ते सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे एक जबरदस्त टीम आहे!” अशा शब्दांत आनंद व्यक्त करण्यात आला.

पोस्टमध्ये पुढे लिहिले होते की,” आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला Barbie अभिमानाने सादर करत आहे आमची पहिली ‘Barbie Dream Team’. आपल्या-आपल्या क्षेत्रात पहिली मोठी झेप घेत पुढील पिढ्यांसाठी नवे मार्ग खुले करणाऱ्या जगभरातील आठ प्रेरणादायी महिलांचा या टीममध्ये समावेश आहे:

सेरेना विल्यम्स (अमेरिका) – टेनिस दिग्गज आणि उद्योजिका
केली गेरार्डी (अमेरिका) -संशोधन अंतराळवीर
रेजिना सिर्व्हेंट (मेक्सिको) – व्यावसायिक रेस कार चालक
क्लो केली (यूके) – फुटबॉलपटू
हेलेन फिशर (जर्मनी) – पॉप गायिका
झोजा स्कुबिस (पोलंड) – मोहिमेतील गिर्यारोहक
स्टेफनी गिलमोर (ऑस्ट्रेलिया) – व्यावसायिक सर्फ
स्मृती मानधना (भारत) – क्रिकेटपटू

जेव्हा मुलींना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी खऱ्या होताना दिसतात तेव्हा त्या मोठी स्वप्नं पाहण्याचं धाडस करतात – जगासाठी, भविष्याकरिता आणि स्वतःसाठी. #Barbie #BarbieDreamTeam”

क्रिकेट कारकिर्दीचा गौरव (Celebrating Her Cricket Journey)

भारतीय महिला क्रिकेटला जागतिक ओळख मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्मृती मानधना हिच्या नावावर आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. Mattelने तिला ‘बार्बी ड्रीम टीम’मध्ये स्थान देत तिच्यावर आधारित खास ‘वन-ऑफ-अ-काइंड’ बार्बी डॉल तयार केली आहे. विशेष म्हणजे, बार्बीच्या इतिहासात प्रथमच एखाद्या क्रिकेटपटूवर आधारित अशी बाहुली तयार करण्यात आली आहे.

स्मृती मानधनाची निवड ही केवळ लोकप्रियतेची नव्हे, तर सातत्यपूर्ण कामगिरीची दखल आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही आंतरराष्ट्रीय स्वरूपांत शतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. या टप्प्याने महिला क्रिकेटच्या प्रवासात नवा अध्याय लिहिला. मैदानावरील तिची आक्रमक फलंदाजी आणि मैदानाबाहेरील संयमी व्यक्तिमत्त्व यामुळे ती तरुण खेळाडूंसाठी आदर्श ठरली आहे.

स्मृतीने शेअर केली खास पोस्ट

स्मृतीने इंस्टाग्रामवर अधिकृत खात्यावरून पोस्ट शेअर करत बार्बी बाहुलीचा फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की,” हा क्षण अजूनही मनात साठवून ठेवते आहे… माझ्या प्रवासातून प्रेरित होऊन तयार झालेली एकमेव खास @Barbie बाहुली पाहणं, लहानपणी कधीच कल्पनाही केली नव्हती. क्रिकेटने मला खूप काही दिलं आहे, आणि माझी कहाणी एखाद्या जरी मुलीला मैदानावर आपली जागा आहे असा विश्वास देऊ शकली, तर त्यापेक्षा मोठं समाधान काहीच नाही. जगभरातील आपल्या-आपल्या क्षेत्रात नवे मार्ग निर्माण करणाऱ्या प्रेरणादायी महिलांसोबत Barbie च्या Dream Team चा भाग होण्याचा सन्मान लाभला, याचा अभिमान आहे. जेव्हा मुलींना अशक्य वाटण्याऱ्या गोष्टी शक्य होऊ शकतात याची जाणीव होते, तेव्हा त्या स्वप्नंही अधिक मोठी पाहतात. #BarbieDreamTeam #YouCanBeAnything #collab”

महिला दिनाचा इतिहास आणि भारतातील संदर्भ (History and Indian Context)

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या कामगार चळवळींपासून सुरू होतो. १९०९ मध्ये अमेरिकेत पहिला महिला दिन साजरा झाला. १९१७ च्या रशियन क्रांतीतील महिलांच्या भूमिकेच्या सन्मानार्थ Vladimir Lenin यांनी ८ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून घोषित केला.

भारतात १९१४ मध्ये पुण्यात महिला दिनाचे पहिले औपचारिक आयोजन झाले. स्वातंत्र्यलढ्यात महिलांनी बजावलेल्या सक्रिय भूमिकेमुळे या दिवसाला अधिक व्यापक अर्थ प्राप्त झाला.

साजरा करण्याच्या विविध पद्धती (How It Is Celebrated)

आजच्या काळात महिला दिन विविध प्रकारे साजरा केला जातो. सार्वजनिक रॅली, परिसंवाद, कार्यशाळा, सोशल मीडिया मोहिमा, तसेच महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारे पुरस्कार समारंभ अशा विविध माध्यमांतून हा दिवस अधोरेखित केला जातो. कार्यस्थळी समानताबाबत जागरूकता वाढवण्यावरही भर दिला जातो.

स्मृती मानधनाच्या बार्बी डॉलमुळे केवळ एका खेळाडूचा गौरव झाला असे नाही, तर बार्बीच्या बदलत्या ओळखीचाही तो एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. फॅशनच्या चौकटीपलीकडे जाऊन आज बार्बी खेळाडू, उद्योजिका आणि नेत्यांचे प्रतिनिधित्व करत आहे. मैदानावर चौकार-षटकार झळकावणारी ही डावखुरी फलंदाज आता बार्बीच्या रूपात नव्या पिढीसमोर उभी आहे — स्वप्न पाहण्याचं आणि ती प्रत्यक्षात उतरवण्याचं धाडस देणारी प्रेरणा म्हणून. महिला दिनाच्या उंबरठ्यावर मिळालेला हा सन्मान केवळ स्मृतीसाठीच नव्हे, तर प्रत्येक त्या मुलीसाठी आहे जी मोठं स्वप्न पाहण्याची हिंमत ठेवते.