Snake Attacks Slipper: सापाचं नाव जरी काढलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. अशातच सोशल मीडियावर समोर आलेला एक व्हिडीओ सध्या लाखो लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. अवघ्या आठ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये दिसणारं दृश्य पाहून अनेक जण चक्रावून गेले आहेत. सापाचा आक्रमकपणा आणि त्यानंतर घडलेला प्रकार पाहून नेटकरीही आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
व्हिडीओमध्ये एक साप दगडांच्या मधोमध बसलेला दिसतो. सुरुवातीला तो शांत असल्यासारखा वाटतो. मात्र, काही क्षणांनी एक व्यक्ती त्याच्यासमोर चप्पल नेताच साप अचानक संतापतो. तो पुन्हा पुन्हा चपलेवर जोरदार फुत्कारासह हल्ला करू लागतो. त्याचा हा आक्रमक अंदाज पाहून कोणालाही धक्का बसेल.
पण, खरी चर्चा सुरू झाली ती पुढच्या क्षणी. साप हल्ला करीत असतानाच त्याच्या तोंडातून हिरव्या रंगाचं द्रव्य बाहेर पडताना दिसतं. हे दृश्य पाहताच अनेकांनी तो विषच असल्याचा दावा केला, तर काहींनी हा व्हिडीओ पाहून विविध तर्क लावायला सुरुवात केली. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.
मात्र खरोखरच ते हिरवं द्रव्य सापाचं विष होतं का? याबाबत तज्ज्ञ वेगळंच सांगतात.
तज्ज्ञांच्या मते, साप प्रत्येक वेळी चावताना समान प्रमाणात विष सोडत नाही. तो कोणत्या प्रजातीचा आहे, त्याचं वय, आकार आणि त्याला त्या क्षणी किती धोका वाटतो, यावर विष सोडण्याचं प्रमाण अवलंबून असतं. काही वेळा साप चावतो; पण अजिबात विष सोडत नाही. अशा प्रकाराला ‘ड्राय बाईट’, असे म्हटले जाते.
तसेच व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारं हिरवं द्रव्य हे नक्कीच विष आहे, असा निष्कर्ष केवळ व्हिडीओ पाहून काढता येत नाही. त्यासाठी वैज्ञानिक तपासणी आवश्यक असते. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक व्हिडीओवर लगेच विश्वास ठेवणं योग्य नसल्याचं तज्ज्ञ सांगतात.
दरम्यान, या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी सापाचा संताप पाहून आश्चर्य व्यक्त केलं, तर काहींनी ‘एवढा राग तर माणसांनाही क्वचितच येत असेल’ अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली. काहींनी मात्र व्हिडीओच्या सत्यतेबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत.
वन्यजीव तज्ज्ञांचौ एक महत्त्वाचं आवाहनही यानिमित्तानं समोर आलं आहे. साप दिसल्यास त्याला चिथावण्याचा किंवा त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये. सुरक्षित अंतर राखावं आणि तातडीनं वन विभाग किंवा सर्पमित्रांना माहिती द्यावी. कारण- सापाला धोका जाणवला, तर तो स्वसंरक्षणासाठी आक्रमक होऊ शकतो.
येथे पाहा व्हिडीओ
सध्या हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यातील हिरव्या द्रव्यामागचं नेमकं रहस्य काय, याबाबतची चर्चा अजूनही सुरूच आहे.
