Philippines Resort Incident: सुट्या म्हटलं की, डोळ्यांसमोर येतात शांत डोंगर, आलिशान रिसॉर्ट, मित्रांसोबतची धमाल आणि निवांत क्षण… पण कल्पना करा, तुम्ही मजेत सुट्टी एन्जॉय करीत आहात आणि अचानक अशी एक घटना घडते की, आनंदाच्या त्या क्षणाचं रूपांतर थेट भीतीमध्ये होतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक थरारक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे आणि तो पाहून अनेकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला आहे.

ही घटना फिलिपाइन्समधील Salvador Benedicto परिसरातील एका रिसॉर्टमध्ये घडल्याचं सांगितलं जात आहे. जंगल आणि डोंगराळ भागाच्या जवळ असलेल्या या ठिकाणी पाच मित्र सुट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले होते. सुरुवातीला सगळं अगदी सुरळीत सुरू होतं. मित्रांची धमाल, फोटोशूट, मजा-मस्ती आणि निवांत वातावरण… पण काही वेळातच सगळ्यांच्या चेहऱ्यावरील हसू गायब झालं.

रिपोर्टनुसार, मित्रांपैकी एक जण वॉशरूममध्ये गेला. काही क्षणांनी तो अचानक घाबरलेल्या अवस्थेत बाहेर धावत आला. त्याचा चेहरा पूर्णपणे पांढराफटक पडला होता. सुरुवातीला मित्रांना वाटलं की, तो विनोद करतोय किंवा कुणाला तरी घाबरवण्याचा प्रयत्न करतोय. पण, त्याच्या चेहऱ्यावरील भीती पाहून सगळेच हादरले.

त्यानंतर मित्रांनी स्वतः जाऊन वॉशरूममध्ये डोकावून पाहिलं आणि जे दृश्य त्यांच्या नजरेस पडलं, ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. टॉयलेटच्या आत काहीतरी हलताना दिसत होतं. सुरुवातीला कुणालाच काय आहे ते समजलं नाही. पण, काही क्षणांतच सगळ्यांच्या अंगावर काटा आला.

कारण… टॉयलेट फ्लश केल्यानंतर पाईपमधून अचानक एक साप बाहेर येताना दिसला!

हा प्रकार पाहताच रिसॉर्टमध्ये एकच गोंधळ उडाला. मित्रांनी तातडीनं रिसॉर्ट कर्मचाऱ्यांना बोलावलं. बराच वेळ काळजीपूर्वक प्रयत्न केल्यानंतर त्या सापाला बाहेर काढण्यात आलं. मात्र, तोपर्यंत सगळ्यांचीच भीतीनं अक्षरशः गाळण उडाली होती.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सापाच्या प्रजातीवरून मोठी चर्चा सुरू झाली. काही लोकांच्या मते, तो साधा वॉटर स्नेक होता; तर काहींनी तो धोकादायक ‘किंग कोब्रा’ असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला. मात्र, स्थानिक प्रशासनाने याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जंगल आणि ओलसर भागाजवळील रिसॉर्टमध्ये अशा घटना अधूनमधून घडू शकतात. विशेषतः पावसाळी वातावरणात साप गटाराच्या पाईप मधून मानवी वस्त्यांमध्ये पोहोचतात, असंही सांगितलं जात आहे.

सोशल मीडियावर मात्र या घटनेबद्दल भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. एका युजरनं लिहिलं, “आता आयुष्यात कधीही निर्धास्तपणे टॉयलेटला जाऊ शकणार नाही.” दुसऱ्यानं मजेशीर प्रतिक्रिया देत म्हटलं, “आता फ्लश करण्याआधी टॉर्च टाकल्याशिवाय मी आत जाणार नाही!”

तर आणखी एका व्यक्तीनं लिहिलं, “ही सुट्टी नव्हतीच… थेट हॉरर चित्रपटाचा अनुभव होता!”

येथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी टॉयलेट वापरताना अधिक सावध राहण्याचा सल्लाही दिला आहे.