Snake Swallowed Golf Balls Video : अमेरिकेतील एक साप सध्या त्याच्या एका विचित्र वैद्यकीय प्रकरणामुळे चर्चेत आहे. या सापाने चुकून एक-दोन नव्हे, तर तब्बल तीन गोल्फ बॉल गिळले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ते बॉल काढण्यासाठी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची गरजही पडली नाही. पशुवैद्यकीय पथकाने शस्त्रक्रियेविनाच काळजीपूर्वक तिन्ही गोल्फ बॉल बाहेर काढले.
ही घटना अमेरिकेतील सॅन अँटोनियो येथील ‘साउथ टेक्सास एव्हियन अँड एक्झॉटिक हॉस्पिटल’मध्ये (South Texas Avian and Exotic Hospital) घडली. रुग्णालयाने या उपचाराचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ऑपरेशनशिवाय कसा वाचवला जीव?
व्हिडिओमध्ये पाहू शकता, उपचारादरम्यान सापाने हालचाल करू नये आणि त्याला त्रास होऊ नये यासाठी डॉक्टरांनी त्याला भूल (सेडेशन) दिली होती. त्यानंतर डॉक्टरांच्या टीमने अत्यंत काळजीपूर्वक सापाच्या शरीरावर हळूवार दाब देऊन चेंडू पुढे ढकलण्यास सुरुवात केली.
डॉक्टरांनी आधी एक चेंडू हळूहळू सापाच्या तोंडाच्या दिशेने आणला. चेंडू तोंडात येताच सापाने तोंड उघडले आणि डॉक्टरांनी तो बाहेर काढला. हीच प्रक्रिया दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूसाठीही वापरण्यात आली.
अंडी समजून गिळले चेंडू?
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युझर्सनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सापाने गोल्फचे चेंडू अन्न समजून कसे गिळले? असा प्रश्न सर्वांना पडला होता. त्यावर काहींनी कमेंट करत लिहिले की, सापाला गोल्फचे चेंडू पक्षांचे अंडी वाटले असावेत, त्यामुळेच त्याने ते गिळले असावेत.
