Lion Attacks SUV Tire Shocking Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ फार हास्यास्पद, तर काही धडकी भरवणारे असतात. सध्या सिंहाचा असाच एक थरारक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात सिंह आपल्या ताकदीच्या जोरावर SUV गाडीच्या टायरची जी काही अवस्था करतो, ते पाहून तुम्हालाहा धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

दक्षिण आफ्रिकेतील जंगलातील या व्हिडीओमध्ये एक बब्बर शेर प्रचंड रागात SUV गाडीच्या मागच्या टायरवर हल्ला करताना दिसतो. त्याचदरम्यान, एक व्यक्ती अत्यंत निडरपणे सिंहाच्या अगदी जवळून जाते आणि ड्रायव्हरला गाडी हळूहळू पुढे घेण्यास सांगते.

ही हिंमत दाखवणारी व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून प्रसिद्ध वन्यजीवप्रेमी ‘डीन श्नायडर’ (Dean Schneider) आहेत. हा सिंह डीन यांना आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे मानतो. मात्र, त्या वेळी सिंहाचा संपूर्ण राग गाडीच्या टायरवर निघतो. व्हिडीओमध्ये दिसते की, गाडी जशी थोडी पुढे सरकते, तसा सिंह अवघ्या काही सेकंदांत लोखंडासारखा मजबूत टायर एखाद्या कागदासारखा फाडून टाकतो. जंगलाच्या राजाच्या ताकदीपुढे मोठ्या गाड्यांचे मजबूत टायरही कसे कमकुवत ठरतात, हेच या दृश्यातून स्पष्ट होते.

कोण आहेत डीन श्नायडर?

डीन श्नायडर हे दक्षिण आफ्रिकेतील अतिशय प्रसिद्ध वन्यजीवप्रेमी व कंटेंट क्रिएटर आहेत. ते तिथे ४०० हेक्टर क्षेत्रात पसरलेले ‘हकुना मिपाका ओएसिस’ (Hakuna Mipaka Oasis) नावाचे एक मोठे प्राणी अभयारण्य चालवतात. त्या ठिकाणी सिंह, बिबट्या आणि इतर वन्यजीवांचे रक्षण केले जाते. विशेष म्हणजे डीन या हिंस्त्र प्राण्यांना पिंजऱ्यात न ठेवता, त्यांच्यासोबत अगदी कुटुंबासारखे राहतात.

मैत्रीचे अनोखे नाते

डीन सतत या सिंहांच्या सहवासात असतात. त्यामुळे हे प्राणी त्यांना आपल्यातलेच एक मानतात. सिंह त्यांच्यावर कधीही हल्ला करत नाहीत. मात्र, प्राण्यांचा राग अनावर झाला की, मजबूत गाड्याही सुरक्षित राहू शकत नाहीत, हे या व्हिडीओवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.