क्रिकेटचा महामेळा अर्थाच विश्वचषक स्पर्धेचं आयोदन यंदा भारतात होत आहे. त्यासाठी जवळपास सर्व देशांचे खेळाडू भारतात दाखल झाले आहेत. काही संघांचे सराव सामनेही झाले असून भारताचा पहिला सामना येत्या ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. एकीकडे हे सर्व संघ आणि त्यांचे खेळाडू भारतातील वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना इथल्या ठिकाणांच्या नावांशीही जुळवून घेण्याचं महाकठीण काम करावं लागत आहे. सध्या केरळमध्ये मुक्कामी असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला असाच काहीसा अनुभव येत आहे. कारण आपण नेमके कुठे थांबलोय, हे सांगताना त्यांच्या नाकी नऊ येत आहेत! वर्ल्डकप २०२३ साठी दक्षिण आफ्रिकेचा संघ केरळमध्ये दाखल झाला आहे. सोमवारी न्यूझीलंडशी आफ्रिकेचा पहिला सराव सामना होणार आहे. त्यासाठी केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये दक्षिण आफ्रिकेचे सर्व खेळाडू थांबले आहेत. मात्र, तिरुवनंतपुरमचा उच्चार करणं या खेळाडूंसाठी महाकठीण कर्म होऊन बसलं आहे! यासंदर्भातला एक व्हिडीओ काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी शेअर केला असून त्यावर एक मिश्किल टिप्पणी त्यांनी केली आहे. "दक्षिण आफ्रिकेचे खेळाडून तिरुवनंतपुरममध्ये दाखल झाल आहेत. पण ते कुठे आहेत हे त्यांना सांगता येईल का?" अशी पोस्ट शशी थरुर यांनी या व्हिडीओसह एक्सवर (ट्विटर) केली आहे. Pakistan Team: हैदराबादमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी मारला बिर्याणीवर ताव, चाहत्यांबरोबर घेतले सेल्फी, पाहा Video काय आहे या व्हिडीओमध्ये? शशी थरूर यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात दक्षिण आफ्रिकेचे सर्व खेळाडू एक-एक करून तिरुवनंतपुरम म्हणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना हे नाव घेताना बरेच कष्ट पडत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. यामध्ये आयपीएलमुळे भारतीय व भारतातील शहरांची चांगलीच ओळख झालेले केशव महाराज, कगिसे रबाडा व लुंगी एनगिडी या तिघांना तिरुवनंतपुरमचं नाव बरोबर घेता आलं. हेनरिक क्लासन शेवटी म्हणाला…! दरम्यान, हे तिघं वगळता व्हिडीओतील एकाही दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला तिरुवनंतपुरमचं नाव व्यवस्थित घेता आलं नाही. हेनरिक क्लासन यानं तर तीन वेळा प्रयत्न करूनही त्याला हे नाव योग्य पद्धतीने उच्चारता आलं नाही. शेवटी तो म्हणाला, "मला वाटतं त्रिवेंद्रम बोलायलाच शिकणं योग्य राहील!" अनेक नेटिझन्सनी यावर प्रतिक्रिया देताना "आम्हालाही या नावाचा उच्चार करताना अडचणी येतात", अशा कमेंट्स केल्या आहेत.