दक्षिण आफ्रिकेत एका महिलेने एकाच वेळी १० मुलांना जन्म दिल्याचं वृत्त सध्या चर्चेत आहे. वृत्तानुसार, महिलेने सात मुलं आणि तीन मुलींना जन्म दिला आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिका सरकारने खासगी आणि सरकारी रुग्णालयांकडे चौकशी करत महिला आणि मुलांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना कोणताही मेडिकल रेकॉर्ड सापडलेला नाही. यानंतर सरकाकडून लोकांना आवाहन करण्यात आलं आहे.

दक्षिण आफ्रिकेतील गोसियामी धमारा सिटहोल या महिलेने एकाच वेळी दहा बाळांना जन्म दिल्याच्या वृत्ताने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं असलं तरी यामध्ये कितपत सत्यता आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

दक्षिण आफ्रिकेतील गव्हर्नमेंट कम्युनिकेशन इन्फर्मेशन सिस्टमचे (जीसीआयएस) संचालक फुमला विल्यियम्स यांनी प्रशासनाला मुलांच्या जन्माचे कोणतेही पुरावे मिळत नसल्याचं सांगितलं आहे.

फुमला विल्यियम्स यांनी ट्विटमध्ये ही बातमी देणाऱ्या IOL news या वेसबाईटला टॅग केलं असून बातमी खोटी असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

दरम्यान ज्या पत्रकाराने ही बातमी दिली आहे त्याने विल्यियम्स यांच्या ट्वीटला उत्तर दिलं असून म्हटलं आहे की, “लोकांच्या माहितीत असूनदेखील आपल्या आपल्या कायदेशीर यंत्रणा एकाही हायप्रोपाइल भ्रष्टाचारी, चोर राजकारण्यांविरोधात गुन्हा दाखल करु शकलेलं नाही. याचा अर्थ त्यांना पाहू शकत नाही किंवा हात लावू शकत नाही म्हणजे ते अस्तित्वाच नाही असा आहे का?. तुमचा तर्क आणि विचारांची गरीबी दुर्दैवी आहे”.

IOL च्या वृत्तानुसार, गोसियामी धमारा सिटहोलने ७ जूनला १० मुलांना जन्म देत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. बातमीमध्ये महिलेच्या पतीचीही प्रतिक्रिया देण्यात आली होती. “सात मुलं आणि तीन मुली आहेत. ती सात महिने आणि सात दिवस गर्भवती होती. मी आनंदी आणि भावूक आहे. मी जास्त काही बोलू शकत नाही. आपण उद्या सकाळी बोलूयात,” अशी प्रतिक्रिया पतीने दिली असल्याचं वेबसाईटने म्हटलं आहे.

दरम्यान सोशल मीडियावरही यावरुन चर्चा सुरु असून अनेकजण पत्रकाराने खोटी बातमी दिल्याचा आरोप करक असून काहीजणांनी महिलेच्या कुटुंबासोबतचे त्याचे फोटो शेअर केले आहेत.

दरम्यान काही आठवड्यांपूर्वीच आफ्रिका खंडातील माली या छोट्याश्या देशातील एका महिलेने एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला होता. मोरक्को येथील रुग्णालयामध्ये या महिलेने एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला होता. असून सर्व बाळांची प्रकृती ठणठणीत असल्याचं माली सरकारने सांगितलं होतं. २५ वर्षीय हालीमा सिसी असं या नऊ बाळांना जन्म देणाऱ्या महिलेचं नाव होतं. हालीमा यांच्या नावे असणारा सर्वाधिक बाळांना एकाच वेळी जन्म देण्याचा विक्रम गोसियामी यांनी मोडीत काढल्याचा दावा आहे.