अनेकांचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न असते. मात्र, यूपीएससीची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे खूप कठीण बाब आहे. लोक वर्षानुवर्षे या परीक्षेची तयारी करतात. मात्र, तरीही उत्तीर्ण होत नाहीत. अनेक जण हेच ठरवू शकत नाहीत की, अभ्यास नेमका कसा करायचा? किती वेळ अभ्यास करायचा? दिवसाचे वेळापत्रक कसे ठरवायचे? असे अनेक प्रश्न मनात फेर धरून नाचू लागतात. तर आज सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये यूपीएससीचा अभ्यास कसा करायचा याच्या काही टिप्स सांगितल्या आहेत.
सोशल मीडियावरील पोस्टनुसार यूपीएससीची तयारी करण्यासाठी नऊ टिप्स सांगितल्या आहेत, त्या पुढीलप्रमाणे आहेत –
१. मोटिव्हेशनल व्हिडीओ जास्त पाहू नका. मानसिक औषध क्षणभर चांगली असतात, पण दीर्घकाळासाठी ती हानिकारक असतात.
२. आयएएस / आयपीएस यांचे ब्लॉग, यूट्यूबवर अभ्यासाशी संबंधित चॅनेल जास्त पाहू नका, कारण कोण काय काम करतं किंवा त्यांनी काय करावे हे पाहण्यात तुमचा वेळ वाया जाऊ शकतो.
३. यूट्यूबवर LBSNAA चे जीवन किंवा निवड, वेतनश्रेणी काय असेल हे आधीच पाहू नका. त्याच्याऐवजी विद्यार्थ्याने आपली निवड कशी होईल यावर लक्ष केंद्रित करा.
४. परीक्षेच्या तयारीसाठी टॉपर्सच्या मुलाखती पाहू नका, कारण तुम्ही गोंधळून जाल.
हेही वाचा…परवान्याशिवाय वाहन चालवणे कितपत योग्य ? अपघातानंतर महिला डॉक्टरने केले उबरला बॉयकॉट; नेमके घडले काय?
पोस्ट नक्की बघा…
५. अभ्यासासाठी जास्त साहित्य गोळा करू नका. तुमच्याकडून जितकं शक्य आहे, जितकं तुम्ही करू शकता फक्त तितकंच स्वतःजवळ ठेवा. उदाहरणार्थ – पुस्तके, गाईड, सराव परीक्षेसाठी नोट्स इत्यादी.
६. एनसीईआरटीकडून प्रत्येक विषय/पेपरसाठी प्रमाणित पुस्तक घ्या.
७. एकाचवेळी दोन पुस्तके वाचण्यापेक्षा एक पुस्तक दोनदा नीट वाचा.
८. जगापासून स्वतःला वेगळे ठेवू नका.
९. तासांऐवजी एका दिवसात तुम्ही किती विषयांचा व्यवस्थित अभ्यास करता आहात याचे निरीक्षण करा.
अनेक जण यूपीएससीची परीक्षा द्यायची आहे हे डोक्यात ठेवून दिवसरात्र अभ्यास करतात. सोशल मीडियापासून, मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबातील सदस्यांपासून लांब राहतात आणि पूर्ण वेळ फक्त अभ्यासात घालवतात. तसेच अनेक जण यूट्यूबचे विविध व्हिडीओ बघून स्वतःला गोंधळात टाकतात, त्यामुळे या युजरने अशा खास टिप्स शेअर केल्या आहेत.
सोशल मीडियावर या टिप्स Reddit ॲपवरून @TerminatorAdr अकाउंटवरून शेअर केल्या आहेत आणि पोस्टच्या कॅप्शनमध्ये ‘यूपीएससीची तयारी करणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांसाठी काही टिप्स’; अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तसेच नेटकरी ही पोस्ट पाहून खूप उपयुक्त टिप्स आहेत, असं विविध शब्दांत कमेंटमध्ये सांगताना दिसून आले आहेत.
